श्री समर्थ वाग्देव महाराज रथोत्सव २४ जानेवारीला

वाठार स्टेशन – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील भगवान श्री समर्थ वाग्देव महाराजांची ८८ वी पुण्यतिथी तसेच रथोत्सव २४ जानेवारीला साजरा होत आहे. यानिमित्त विविध प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे. यात्रेचा शुभारंभ दि. १६ जानेवारीपासून तर यात्रेची सांगता दि. २५ रोजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी फुलांच्या कीर्तनाने होत आहे.
यात्रेच्या प्रारंभी सामुदायिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम दि. १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता कलशपूजन तर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरुणकुमार पवार व पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांच्या हस्ते ध्वजपूजन होत आहे. श्री समर्थ वाग्देव महाराज रथोत्सव बुधवार दि. २४ रोजी सकाळी १० वाजता साजरा होणार आहे. रथाचे पूजन प. पू. सोन्ना बुवा रामदासी (श्री क्षेत्र सज्जनगड) यांच्याहस्ते,
प. पू. श्री. ब्रह्मानंद महाराज सदगुरू जंगली महाराज आश्रम अंबवडे संमत वाघोली, आ. दीपक चव्हाण, आ. महेश शिंदे, आ. गोपीचंद पडळकर, जिलहा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रफुल्ल गोविंद पाटील (नगरसेवक वसई विरार), गणेश वळकुंदे (केंद्रीय अन्नपुरवठा महामंडळ सल्लागार समिती संचालक), दत्तात्रय देशमुख (तळीये), राजेंद्र शेळके (पोलीस उपअधीक्षक), शिवाजी भोसले (सहाय्यक पोलीस निरीक्षक) सौ. नीता संजय माने (सरपंच वाठार स्टेशन) या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. रथपूजनानंतर रथाची मिरवणूक वाठार गावातून वाठार स्टेशन बाजार पेठेत जाणार आहे.
यात्रा कालावधीमध्ये दि. १६ पासून सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सोहळ्याचे आयोजन केले आहे. पारायण सोहळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांना सकाळचा अल्पोपहार, दुपारचे जेवण, तसेच सायंकाळचे जेवण अन्नदात्यांमार्फत देण्यात येणार आहे. यात्रा पारायण कालावधीमध्ये प्रसिद्ध कीर्तनकाराची कीर्तने आयोजित केली आहेत. त्यामधे हभप भरत हरी महाराज नशिराबाद जळगाव, हभप श्रावण महाराज अहिरे मालेगाव नाशिक, हभप तुळशीदास शंकर महाराज रसाळ पंढरपूर, हभप बाळकृष्ण दादा वसंतगडकर, हभप संतोष महाराज पायगुडे मांडवी पुणे,
हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, हभप प्रदीप महाराज नलावडे तांबवे यांचा समावेश आहे. श्रीमती रंजना नामदेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ मंगळवार दि. २३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हभप श्री भागवताचार्य केशवदादा महाराज उखळीकर बीड यांचे काल्याचे किर्तन कार्यक्रम होणार आहे. काल्याच्या किर्तनानंतर कै. रघुनाथ दत्तोबा जाधव यांच्या स्मरणार्थ पारायणास तसेच यात्रेस येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाची सोय केली आहे. यात्रेनिमित्त दि, १२ पासून हाफस्पीच क्रिकेट स्पर्धा, ओपन बैलगाडा शर्यत शनिवार दि. २७ जानेवारी रोजी आयोजित केली आहे. भाविकांनी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. .





