Satara | सोळशीच्या कार्यक्रमात दीपक चव्हाणांची फलटणमधून उमेदवारी जाहीर

वाठार स्टेशन (प्रतिनिधी)- सोळशी ग्रामपंचायत नुतन इमारत ही गावच्या वैभवात मानाचा तुरा आहे, असे प्रतिपादन आ. रामराजे ना. निबाळकर यांनी केले.
येथील एक कोटी रूपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या इमारतीचे उदघाटन आणि नवनिर्वाचीत खा. नितीन पाटील यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. नितीन पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निबाळकर, बाळासाहेब सोळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोळशी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अजितदादा पवार उत्तर कोरेगावमध्ये येणार होते. मात्र, अचानक बैठक लागल्याने त्यांचा दौरा रद्द झाला.
सायंकाळी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आ. रामराजे ना. निंबाळकर यांचे भाषण सुरू असतानाच ना. अजितदादांनी मुंबई बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळस्कर यांना फोन करून सोळशी ग्रामस्थांशी वीस मिनिट दूरध्वनीद्वारे संवाद साधला.
यावेळी ना. अजितदादांनी फलटण विधानसभा मतदार संघातून आ. दीपक चव्हाण हेच उमेदवार असतील, अशी घोषणा केली. त्यांच्या या खेळीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ना. अजितदादा हे येणार होते.
मात्र, त्यांना राज्यपालांसमवेत महत्वाची बैठक लागल्याने त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे कार्यक्रमादरम्यानच त्यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधत आ. दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
ना. अजितदादा ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले, फलटण मतदारसंघातून दीपक चव्हाण हेच उमेदवार राहतील, त्यांना सर्वांनी सहकार्य करावे.
लाडक्या बहिणींची दिलगिरी व्यक्त करतो, पुढील हप्ता लवकरच जमा होईल. तसेच विविध योजना व तुमच्या भागातील पाणी प्रश्नाबाबत लक्ष घातले आहे.
अतीवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करायला लावले आहेत. शेतकरी वीज बील संपूर्ण माफी केली आहे. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील आहे. या भागाचा लवकरच दौरा करून तुमच्याशी संवाद साधेन, अशी ग्वाही दिली.
खा. नितीन पाटील म्हणाले, मी बँकेच्या कामासाठी नागपूरला अजितदादांकडे गेलो तेव्हा खासदारकीबद्दल बोलले होते. आपल्याला त्यांना २० वर्षे सहकार्य करावे लागणार आहे.
अजितदादांनीच किसनवीर व खंडाळ्याला थकहमी मिळवून दिली. मेडिकल कॉलेजला निधी दिला, असेही ते म्हणाले.
आ. दीपक चव्हाण यांना सोळशीतून आघाडी देणार आहे. मात्र, भविष्यात शरद पवार यांच्याकडे गेलो तर राग मानू नका कारण ते माझे दैवत आहेत.
त्यांच्यामुळेच मी आज घडलो आहे. रामराजे व माझे भांडण नाही. रामराजे मला विश्वसात घेतल्याशिवाय काहीच करत नाहीत, असे बाळासाहेब सोळस्कर म्हणाले.
कार्यक्रमाला नितीन भरगुडे पाटील, शिवाजीराव महाडीक, मंगेश धुमाळ, किरण साबळे, रामभाऊ लेंभे, संजय साळुंखे, शशिकांत पवार, अजित भोईटे, जितेंद्र जगताप,सुरेश निकम, सागर लेंभे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंच आकाश सोळस्कर यांनी प्रास्तविक केले.
शरद पवार यांच्यावर माझी श्रध्दा व प्रेम
यावेळी आ. रामराजे म्हणाले, सातारा जिल्ह्याचा मला अभिमान आहे. बाहेर मी अभिमानाने साताऱ्याबद्दल बोलत असतो. परंतु, दोन व्यक्ती या जिल्ह्याला लागलेली कीड आहे. त्यांच्याकडून वेगळ्या पध्दतीने राजकारण केले जाते.
त्यांना यावेळी मी पाडणारच आहे. शरद पवार यांच्यावर माझी श्रध्दा व प्रेम आहे. सोळशी धरणाच्या पाण्यावर हक्क व दावा करणे गरजेचे होते. मात्र, यावर येथील एकही नेता बोलताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.





