पुणे जिल्हा : आळंदीत फुलला भक्तिचा मळा

जागोजागी हरीनामाचा गजर : परिसर भक्तिरसात न्हाला
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीत कार्तिकी एकादशी वारी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 728व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्याच्या कानकोपर्यातून हजारोंच्या संख्येने भाविक वारकरी दाखल होत आहेत. रविवारी (दि. 24) श्री गुरु हैबातबाबा पायरी पूजनाने माऊलींच्या सोहळ्याची सुरुवात झाली आहे. आळंदी पंचक्रोशीत हरीनाम सप्ताह सुरू आहेत. भजन, कीर्तन, हरिपाठ, भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आळंदी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. सोहळ्यासाठी आलेल्या भाविकानी सर्व रस्ते फुलले आहेत. मंगळवारी (दि. 26) कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) तर गुरुवारी (दि. 28) माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा आहे.
धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी –
मुख्य मंदिरासह आळंदीत माऊलींशी संबंधित ठिकाणानावर भाविक दर्शनासाठी गर्दी दिसत आहे. भैरवनाथ चौक येथील माऊलींनी चालवलेली भिंत, मरकल रस्त्यावरील संतोषी माता मंदिर, पद्मावती मंदिर, माऊलींचे राहते घर असलेले ठिकाण सिद्धबेट, मोशी रोडवरील गजानन महाराज मंदिर, वडगाव रोडवरील माऊली आणि योगी चांगदेव यांच्या भेटीचे ठिकाण विश्रांतीवड, इंद्रायणी घाट आदी ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची दिवसभर वर्दळ दिसून येत आहे.
इंद्रायणी घाट गजबजला
आळंदीतील इंद्रायणी घाटावर विश्व शांती केंद्र येथे हरीनाम सप्ताह सुरू आहे. सायंकाळी येथील कार्यक्रम पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने घाटावर जमलेले दिसतात. तसेच सकाळी स्नाणासाठीही घाटावर मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक भाविक घाटावर मुक्कामी असतात त्यामुळे चोवीस तास इंद्रायणी घाटावर भाविकांची मांदियाळी आहे. इंद्रायणी नदीत कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी आळंदी नगर परिषदेच्या वतीने रेस्कयू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. येथे भाविकांची जास्त वरदळ लक्षात घेऊन पोलिसांनीही मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
दर्शनबारी इंद्रायणी घाटापलीकडे
कार्तिकी वारी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे त्यामुळे आता आळंदीत वारकरी भाविकांची गर्दी वाढत आहे. वारीला आल्यानंतर भाविक माऊलीं समाधीचे दर्शन घेत असतात. या समाधी दर्शनासाठीची रांग इंद्रायणीच्या पलीकडील घाटावर पोहोचली आहे. दर्शनासाठी पाच तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे भाविकांनी सांगितले. जासजशी भाविकांची संख्या वाढेल तसतसा दर्शनासाठी लागणारा वेळ वाढत जात आहे.
आज माऊली मंदिरातील कार्यक्रम
कार्तिक वद्य दशमी, सोमवारी (दि. 25) पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11.30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12 ते 12.30 महानैवेद्य, सायं. 4.30 ते 6.30 वा. गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, सायंकाळी 6.30 ते 8:.30 वा. वीणा मंडपामध्ये धोंडोपंत दादा अत्रे यांच्या तर्फे कीर्तन सेवा, 8.30 ते 9 धुपारती, रात्री 9 ते 11 वासकर महाराज कीर्तन सेवा (वीणा मंडप), रात्री 11.30 ते 12.30 वाल्हेकर महाराज यांच्यातर्फे जागर.





