Satara | देऊर ओढ्यावरील पूल बनला मृत्यूचा सापळा

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी)- सातारा-लोणंद महामार्गावर देऊर, ता. कोरेगावच्या हद्दीत असणाऱ्या ब्रिटिशकालीन देऊर ओढ्यावरील पुलावर असलेल्या खड्ड्यांमुळे तिहेरी अपघातात प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार देऊर येथील देऊर ओढा नावाच्या पुलावर येत असताना पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार आहे. या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत.
शुक्रवार दि. ४ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लोणंद बाजूकडून सातारच्या दिशेने जाणारा टेम्पो (एम एच ०९ एल ८९५०) हा टेम्पो सातारा बाजूकडे जात होता. खड्ड्यांमुळे चालकाने टेम्पोचा वेग कमी केला.
यावेळी पाठीमागून लोणंद बाजूकडून भरधाव वेगात आलेला कंटेनर (एम एच १२ एस एफ २३१८) याने कंटेनर कंट्रोल न झाल्याने पुढील टेम्पोला ओव्हरटेक करत असताना पूल अरुंद असल्याने टेम्पोला घासत गेला.
यावेळी सातारा बाजू कडून येणारा लेलँड कंपनीच्या दोस्त टेम्पो क्रमांक (एम्एच १४ जे एल ५५७५) ला कंटेनरने धडक दिल्याने टेम्पोमधील प्रवासी जखमी झाला.
जखमी प्रवाशाला उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले. तिहेरी अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातामुळे ठप्प झालेली वाहतूक वाठार पोलिसांनी सुरळीत केली.
वाहतुकीसाठी हा पुल धोकादायक
धडकेत ब्रिटिशकालीन पुलाच्या कठड्याचे दगड हलल्याने वाहतुकीसाठी हा पुल धोकादायक झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देऊर पुलावर सततचे होणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी वाहनधारक व प्रवासी यांच्याकडून होत आहे.





