Satara | देऊर पुलावरील खड्ड्यांमुळे ट्रक पूलाच्या कठड्याला धडकला

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – सातारा ते लोणंद राज्य मार्गावर देऊर ता. कोरेगावच्या हद्दीत असणाऱ्या ब्रिटिशकालीन देऊर ओढ्यावरील पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे ट्रक पुलाच्या कठड्याला धडकल्याची घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दि. ३० रोजी पहाटेच्या सुमारास लोणंद बाजूकडून सातारच्या दिशेने जाणारा ट्रक (आरजे २७ जीबी ७७२६) हा ट्रक देऊर, ता. कोरेगाव च्या हद्दीत असणाऱ्या पूलावर आल्यावर मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या डाव्या बाजूस कठड्याला धडकला.
वेळीच चालकाने प्रसंगावधान राखून अनियंत्रित झालेला ट्रक थांबवल्याने मोठी दुर्घटना टळू शकली.ट्रक धडकल्याने ट्रकचे नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक पुलाच्या कठड्याला धडकल्याने कठड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सातारा ते लोणंद मार्गावर देऊर ता कोरेगाव च्या हद्दीत देऊर ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पुलावर वारंवार मोठ मोठे खड्डे पडत असल्याने त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस विभागाने सदर मार्गावरील पडलेले खड्डे खडी व मुरमाने दोन ते तीन वेळेस भरून घेतले आहेत.
मात्र, याबाबत संबंधित विभागाला याचे कोणतेही देणे घेणे नाही. वाहनधारकाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.





