Satara | वाठार स्टेशन येथील भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य

वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – वाठार स्टेशन येथील रेल्वेचे गेट नंबर ४५ बंद करून त्याच ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग बनवला या भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे रेल्वे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
रेल्वेने गेट नंबर ४५ बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग केला मात्र यामुळे वाठार स्टेशन बाजारपेठेचे दोन तुकडे झाले. भुयारी मार्गाच्या पूर्वेला पोलीस स्टेशन, बँका, महावितरण, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच महाविद्यालय, पोस्ट ऑफिस, खाजगी बँका तर पश्चिमेला बँक ऑफ महाराष्ट्र, रेल्वे स्टेशन, तलाठी ऑफिस, मंडल कार्यालय,
ग्रामपंचायत अशी दोन्ही बाजूला सरकारी कार्यालय व व्यापारी बाजारपेठ असल्याने रेल्वेच्या पूर्व व पश्चिम बाजूला जाण्यासाठी लोकांची गैरसोय होत होती. यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रेल्वे कडे पाठपुरावा करून पादचारी मार्गाची मागणी केली होती.
लोकांच्या मागणीचा विचार करून रेल्वे विभागाकडून दीड वर्षांपूर्वी पादचारी भुयारी मार्ग तयार केला. मात्र, भुयारी मार्गात विजेची सोय केली नसल्याने रात्रीच्या वेळेस महिलांना ये जा करत असताना भीती वाटते. दीड वर्षांपूर्वी केलेल्या भुयारी मार्गात वयोवृद्धांना जाण्यासाठी केलेले रेलिंगची मोडतोड झाली आहे. शिवाय पायऱ्यावरील फरशा सुद्धा फुटल्या आहेत, त्यामुळे जाण्यासाठी लोकांना कसरत करावी लागत आहे.
दुर्गंधीने नागरिक हैराण
पावसाचे पाणी जाण्यासाठी केलेल्या ड्रेनेजला जाळी नाही, भुयारी मार्गात दल दल चीक चीक झाल्यामुळे पादचाऱ्यांना नीट चालता सुद्धा येत नाही. आतमध्ये कचराकुंडी झाल्यासारखी परिस्थिती झाली आहे.
त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे जाणाऱ्या येणाऱ्यांना नाकाला रुमाल लावूनच जावे लागते. या परिस्थितीमुळे लोकात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी रेल्वे विभागाने भुयारी मार्गात चांगल्या सुविधा देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.





