Satara Politics : शिवेंद्रसिंहराजेंनी शब्द खरा केला,अमोल मोहिते सातारच्या नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार

प्रभात वृत्तसेवा
सातारा : सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर सातारकरांना मिळाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक, जनता सहकारी बँकेचे चेअरमन आणि माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांना भाजपची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत मोहिते यांनी ए, बी फॉर्मसह उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल यांच्याकडे सोमवारी दाखल केला.
सातारा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संग्राम बर्गे यांचे नाव शेवटच्या क्षणी मागे पडल्याने, खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे यांच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अमोल मोहिते यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे सातारा शहराच्या राजकारणामध्ये आमदार गटाने खासदार गटावर राजकीय कडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सातारा पालिका निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्याकडे 50 जागांसाठी 213 आणि नगराध्यक्षपदासाठी 19 उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. अधिकृत आकडा सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कडक पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू झाली.
भाजपचा शेवटच्या क्षणापर्यंत नगराध्यक्षपदाचा घोळ
निवडणुकीत बंडखोरी होऊ नये, म्हणून दोन्ही राजांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवला होता. सातार्याच्या राजकारणावर गेली 25 वर्षे उदयनराजेंचा प्रभाव राहिला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांच्याच आघाडीचा नगराध्यक्ष असल्याने, यंदाही संग्राम बर्गे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार, अशी चर्चा होती. नगरविकास आघाडीच्यावतीने अविनाश कदम व अमोल मोहिते यांच्या नावांची चर्चा होती.
दोन्ही राजांच्या गेल्या दोन दिवसांत झालेल्या मॅरेथॉन बैठकांमधील वाटाघाटी निष्फळ ठरल्या. दोन्ही नेत्यांची रविवारी (दि. 16) रात्री वाढे फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये पुन्हा तीन तास चर्चा होऊनही, केवळ प्रभागांमधील उमेदवारांना ए, बी फॉर्मचे निरोप देण्याइतपतच काम झाले. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अमोल मोहिते यांच्यासह ए, बी फॉर्म घेऊन, सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास पालिकेच्या सभागृहात दाखल झाले, तेव्हाच मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले.
फक्त भाजप हाच फॉर्म्युला
अमोल मोहिते यांचा अर्ज भरल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री लाभला आहे. त्यांनी 300 कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे सातार्यात दिली आहेत. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला साथ दिली. आता सातारा पालिकेतही भाजपचाच नगराध्यक्ष आणि भाजपचे वर्चस्व राहील, या दृष्टीने प्रयत्न करू.





