Satara News: प्रवाशांशी अरेरावी अन् दादागिरी? ‘त्या’ बेशिस्त रिक्षाचालकांवर ओढवणार मोठे संकट
Satara News: प्रवाशांशी अरेरावी अन् अनियंत्रित पार्किंग खपवून घेणार नाही; शहर वाहतूक शाखेच्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचा थेट इशारा.

Satara News – मनमानी भाडे आकारणे, वाहतूक नियमांना बगल देणे, रिक्षांचे पासिंग वेळेत न करणे आणि रिक्षा सुस्थितीत न ठेवणे, अशा तक्रारींमुळे शहरातील रिक्षाचालक वाहतूक शाखेच्या रडारवर आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांची वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच रिक्षा तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
शहरातील विविध रिक्षा थांब्यांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी (दि. 8) शहर वाहतूक शाखेच्या अधिकार्यांनी घेतली. या बैठकीत रिक्षाचालकांच्या समस्या आणि सूचनांवर चर्चा करुन, प्रवाशांना दिल्या जाणार्या सेवेबाबतही प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडली. प्रवाशांना अडवून मनमानी भाडे आकारण्याच्या तक्रारी गांभीर्याने घेण्यात आल्या. रिक्षाचालकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे,
अशा सूचना देतानाच, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे बजावण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी रिक्षाचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. आरटीओच्या नियमानुसार रिक्षा सुस्थितीत ठेवणे, कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आणि पासिंग करून वेळेत घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या काही दिवसांत रिक्षांची तपासणी मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेत रिक्षांची कागदपत्रे, फिटनेस, पासिंगसह अन्य बाबी तपासण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे राजेश माने यांनी सांगितले.
प्रवाशांची लूट खपवून घेणार नाही
रिक्षा हे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांना योग्य सेवा देणे अपेक्षित आहे. काही चालक प्रवाशांना ठरावीक ठिकाणी जाण्यास नकार देतात. मनमानी पद्धतीने भाडे आकारण्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यामुळे तपासणी मोहिमेत वाहनांच्या कागदपत्रांसोबतच प्रवाशांच्या तक्रारींवरही वाहतूक शाखेचे लक्ष राहणार आहे.
थांब्यांवरील बेशिस्तीला बसणार लगाम
शहरातील रिक्षा थांब्यांवर रिक्षांचे अनियंत्रित पार्किंग करुन, वाहतुकीला अडथळा केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. रिक्षाचालकांनी निश्चित केलेल्या ठिकाणीच रिक्षा उभ्या कराव्यात. प्रवाशांची चढउतार करताना, वाहतुकीला अडथळा होऊ न देण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.






