Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा
Pune Traffic Update: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा निर्णय; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन.

Pune Traffic Update – कोथरूड व डेक्कन वाहतूक विभागाच्या हद्दीतील महादेव मंदिर चौक येथून नदीपात्राकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी टाळून वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला आहे.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार आदेश जारी केले असून, महादेव मंदिर चौकातून नदीपात्राकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नदीपात्राकडून महादेव मंदिर चौकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी मात्र एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. या पूर्वीचे सर्व वाहतूक आदेश रद्द करण्यात आले आहेत.
वाहन चालकांनी महादेव मंदिर चौकातून डावीकडे वळून पाडळे पॅलेस सर्कलमार्गे शारदा सेंटरकडे किंवा उजवीकडे वळून बालाजी एंटरप्रायजेस लेनमार्गे इच्छितस्थळी जाण्याचा पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आदी अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी वाहतूक कर्मचारी व स्वयंसेवकांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.





