Satara News : सापळा रचून मोराची शिकार; मांस शिजवून मेजवानी, संशयित वनविभागाच्या ताब्यात
घटनास्थळाचा पंचनामा केला असता दोन पातेल्यांमध्ये शिजवलेले मांस, मोराची पिसे, दोन पाय तसेच शिकार करण्यासाठी वापरलेला सापळा आढळून आला.

Satara News – राष्ट्रीय पक्षी मोराची सापळा रचून शिकार करून त्याचे मांस शिजवून मेजवानी केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा तालुक्यातील वरये परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी सातारा वनविभागाने तातडीने कारवाई करत सागर गौतम पवार (वय २५, रा. वरये, ता. जि. सातारा) याला ताब्यात घेतले आहे.
वरये परिसरात मोराची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान संशयिताने मोराला सापळ्यात अडकवून त्याची शिकार केल्याचे निष्पन्न झाल्याचे वनविभागाने सांगितले.
घटनास्थळाचा पंचनामा केला असता दोन पातेल्यांमध्ये शिजवलेले मांस, मोराची पिसे, दोन पाय तसेच शिकार करण्यासाठी वापरलेला सापळा आढळून आला. याशिवाय तीन छोटे सुरे, मोठा सत्तूर, विळी, लाकडी पाट आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोर हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षित वन्यजीव असल्याने त्याची शिकार करणे गंभीर गुन्हा आहे. जप्त केलेले मांस व अवशेष वैज्ञानिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ यांच्या नेतृत्वाखाली सातारा वनपरिक्षेत्र व फिरत्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी परिसरात गस्त अधिक तीव्र करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.





