PCMC Action – पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम आणखी तीव्र केली असून नवी सांगवी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने नेताजीनगर, गांगर्डे नगर, विनायक नगर आणि गजानन नगर परिसरातील तीन अनधिकृत आर.सी.सी. बांधकामांवर बुलडोझर चालवत ती जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली. महापालिकेच्या माहितीनुसार, संबंधित बांधकामे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. अंदाजे १३० चौरस मीटर म्हणजेच सुमारे १४०० चौरस फूट क्षेत्रावरील ही बांधकामे हटवून जागा मोकळी करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोहिमेत उपअभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, बीट निरीक्षक रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे आणि सुरज माने यांनी सहभाग घेतला. कारवाईसाठी १८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, १० मजूर, एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर-ब्रेकर तैनात करण्यात आले होते. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, “अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करूनच बांधकाम करावे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.