Adani project : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे अनेक वेळा न्याय मागितला. मात्र, त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. उलट कंपनीलाच पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे, असा तीव्र आरोप करत कळंबे व डफळवाडी येथील संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात तलाव परिसरात आत्मदहन व जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिस्थिती गंभीर बनताच उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली. मंडलाधिकारी व प्रांताधिकार्यांशी चर्चा करून सोमवारी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मौजे कळंबे येथील गायरान जमीन अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला देण्याचा निर्णय ग्रामस्थांना पूर्णपणे अंधारात ठेवून घेतल्याचा आरोप कळंबे ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. जिल्हाधिकार्यांनी 17 मार्च 2026 रोजी काढलेल्या आदेशानुसार तब्बल 28.69 हेक्टर क्षेत्र खाजगी कंपनीला देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभा व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला स्पष्ट विरोध दर्शवूनही प्रशासनाने तो डावलला. गावाच्या मालकीचा आणि जनावरांच्या चराईसाठी उपयोगी असलेला गायरान भाग थेट खाजगी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सुमारे 200 कोटी रुपये बाजारमूल्य असलेले क्षेत्र खाजगी कंपनीला देण्यात येत असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयाच्या जगपालसिंग विरुद्ध पंजाब राज्य या महत्त्वपूर्ण निकालाचाही उल्लेख केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 12 जुलै 2011 च्या शासन निर्णयाची पायमल्ली झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कळंबे, जळव आणि जांभेकरवाडी या तीन स्वतंत्र महसुली गावांमध्ये गायरान जमिनीच्या बदल्यात विखुरलेल्या स्वरूपात जमीन देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित ग्रामपंचायतींना किंवा स्थानिक नागरिकांना कोणतीही माहिती न देता हा निर्णय घेण्यात आल्याने संताप अधिक वाढला आहे. गावापासून दूरवर असलेली जमीन गायरान म्हणून कोणत्याही उपयोगाची नाही. भविष्यातील शासकीय प्रकल्प, गुरे चराई आणि गावाच्या विकासासाठी कळंबे महसुली हद्दीतच दुप्पट जमीन मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंदोलनस्थळी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. गावकर्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी प्रशासन आणि कंपनीच्या बाजूने भूमिका घेतली जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी ग्रामस्थांनी अदानी कंपनीच्या कामाला तीव्र विरोध कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. गावाच्या हक्काची जमीन वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देऊ, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलीस ठाण्याकडून सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव परिसर, धरण परिसर तसेच गावातील प्रमुख मार्गांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, आंदोलन तीव्र करण्याच्या भूमिकेत असलेल्या काही ग्रामस्थांनी धरणाकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत आंदोलनकर्त्यांना रोखले. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत ग्रामस्थांशी चर्चा केली. Pune District : अतिक्रमणावर कारवाई की पुन्हा तडजोड? प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष