Satara News: सातारा राजकारणात मोठी घडामोडी! उदयनराजे-मदन भोसले यांची गुप्त भेट; ‘त्या’ चर्चेने राजकारण तापले
Satara News: खासदार उदयनराजे भोसले आणि वाईचे माजी आमदार व जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले यांची सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये भेट झाली.

Satara News – खासदार उदयनराजे भोसले आणि वाईचे माजी आमदार व जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले यांची सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये आज स्नेहपूर्ण सदिच्छा भेट झाली. तब्बल चार- पाच दशकांच्या ऋणानुबंधांना उजाळा देणारी ही भेट राजकीय वर्तुळासह त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरली. दीर्घकाळापासून असलेल्या जिव्हाळ्याच्या मैत्रीमुळे दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी अत्यंत मनमोकळ्या वातावरणात संवाद झाला.
जुन्या आठवणी, सामाजिक बांधिलकी आणि बदलत्या राजकीय- सामाजिक परिस्थितीवर गप्पा रंगल्या. या भेटीला कोणत्याही औपचारिकतेपेक्षा स्नेह आणि आपुलकीचा स्पर्श अधिक जाणवत होता. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वाई- खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघातील विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा झाली. ग्रामीण भागातील विकास, जनतेच्या अपेक्षा आणि भविष्यातील विकासाची दिशा याबाबत दोन्ही नेत्यांनी आपले विचार मांडले.
जिल्ह्याच्या विकासाला अधिक व्यापक दृष्टी देण्याच्या अनुषंगानेही विचारविनिमय झाला. विशेषतः युवा पिढीच्या भविष्याबाबत दोन्ही नेत्यांनी अत्यंत आपुलकीने आणि दूरदृष्टीने चर्चा केली. शिक्षण, रोजगार, नव्या संधी आणि तरुणांच्या अपेक्षा लक्षात घेऊन भविष्यातील वाटचाल कशी असावी, याबाबत विचार व्यक्त करण्यात आले. समाजाच्या पुढील पिढीला सक्षम करण्याची गरज या संवादातून अधोरेखित झाली.
उदयनराजे भोसले आणि मदन भोसले यांच्या प्रदीर्घ स्नेहसंबंधांची साक्ष देणारी ही भेट केवळ सदिच्छा भेट न ठरता सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक विचारांची सकारात्मक बैठक ठरली. दोन्ही नेत्यांच्या अनुभवातून आणि दूरदृष्टीतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाबाबत सकारात्मक संदेश या भेटीतून मिळाला. या प्रसंगी ॲड. धनंजय चव्हाण, सुनील काटकर, पै. मनोज भोसले, शेखर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.





