Satara Municipal Council: नगरपालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा! मतदार यादी पुनर्निरीक्षणा मुळे विकासकामे आणि नागरी सेवा ठप्प
Satara Municipal Council: सुमारे ७० बीएलओंद्वारे मॅपिंग अन् प्रमाणीकरणाचे काम सुरू; वसुली, बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण विभागातील सेवा मंदावल्या.

Satara Municipal Council – मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेसाठी सातारा नगरपालिकेतील कर्मचारी आणि शिक्षण मंडळातील शिक्षक मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर ताण निर्माण झाला आहे. सुमारे दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे विकासकामांच्या गतीवर परिणाम होत असून विविध विभागांतील नियमित कामकाजही संथ झाल्याचे चित्र आहे.
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मतदारांच्या नावांचे मॅपिंग आणि प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुमारे 70 बीएलओंच्या माध्यमातून सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ गुंतल्याने पालिकेतील अनेक विभागांमध्ये कर्मचारी उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. पालिकेतील वसुली, बांधकाम, आरोग्य, आस्थापना, शहर विकास आणि शिक्षण मंडळ विभागांमध्ये दुपारी दोननंतर कर्मचारी संख्या लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे दिसून येते.
त्यामुळे विविध कामांसाठी येणार्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असून काही कामे पुढे ढकलली जात आहेत. नगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षक बीएलओ म्हणून जबाबदारी सांभाळत असल्याने शाळांतील अध्यापन व्यवस्थेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. शिक्षक शाळेत उपस्थित राहत असले तरी अध्यापन आणि निवडणूक विषयक कामाचा समतोल राखताना त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत असल्याचे सांगितले जात आहे.
मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण ही निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची बाब असली, तरी त्याचवेळी पालिकेच्या विकासकामांमध्ये आणि नागरिकांना दिल्या जाणार्या सेवांमध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत, यासाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे किंवा कामाचे प्रभावी नियोजन करणे आवश्यक असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





