Satara DCC Bank Election: जिल्हा बँकेची अंतिम मतदारयादी जाहीर; ८ ठराव बाद, कोणाचे पत्ते कट अन् कोणाची बाजी?
Satara DCC Bank Election: सोसायटी मतदारसंघासह विविध गटांतील ८ ठराव रद्द तर औद्योगिक गटात १२ ठरावांची वाढ; अंतिम मतदारयादी जाहीर होताच उमेदवारीसाठी राजकीय गणितांना वेग.

Satara DCC Bank Election – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित अंतिम मतदारयादी आज प्रसिद्ध झाली. कच्च्या मतदारयादीतील २ हजार २७ मतदारांपैकी २ हजार १९ मतदार अंतिम यादीत कायम राहिले असून, आठ ठराव बाद झाले आहेत. अंतिम यादी जाहीर झाल्याने आता निवडणूक कार्यक्रमाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सोसायटी मतदारसंघातील महाबळेश्वर, माण, फलटण आणि कोरेगाव येथील प्रत्येकी एक ठराव कमी झाला आहे. तसेच खरेदी- विक्री संघ, नागरी बँका- पतसंस्था मतदारसंघातील प्रत्येकी एक, तर गृहनिर्माण मतदारसंघातील दोन ठराव रद्द झाले आहेत. दुसरीकडे औद्योगिक, विणकर व मजूर संस्था मतदारसंघात १२ ठरावांची वाढ झाली आहे.
अंतिम यादीतील २ हजार १९ मतदारांमध्ये ११ विकास सोसायटी मतदारसंघातील ९६३ मतदारांचा समावेश आहे. याशिवाय खरेदी- विक्री संघ मतदारसंघात १०, कृषी प्रक्रिया संस्था २९, नागरी बँका व पतसंस्था ३७९, गृहनिर्माण व दूध संस्था २९५, तर औद्योगिक, विणकर व मजूर संस्था मतदारसंघात ३४३ मतदार आहेत.
सातारा १४६, जावळी ४८, महाबळेश्वर १२, कराड १४६, पाटण १०४, कोरेगाव ९०, खटाव १०२, माण ७५, खंडाळा ५०, वाई ५९ आणि फलटण १३१ अशी तालुकानिहाय सोसायटी मतदारसंख्या आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. विद्यमान संचालकांसह इच्छुकांनी विविध मतदारसंघांतून यापूर्वीच ठराव करून ठेवले आहेत.
आता कोणत्या गटाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का आणि दिग्गज नेत्यांमध्ये जागावाटपाची समीकरणे कशी ठरणार, याकडे लक्ष लागले आहे. निवडणूक कार्यक्रम अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर नियमानुसार जाहीर होणार असून, त्यानंतर साधारण ४५ दिवसांनी मतदानाची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





