Navnath Ban: “निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, MPSC सगळे चुकीचे फक्त संजय राऊतच बरोबर?” ; भाजपची खोचक टीका
Navnath Ban: MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न, OBC आरक्षण, कोरोना काळातील कारभार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होणारी टीका, ध्वनी प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Navnath Ban: MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न, OBC आरक्षण, कोरोना काळातील कारभार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होणारी टीका, ध्वनी प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण न करता सरकार हा प्रश्न सक्षमपणे सोडवेल, असा दावा त्यांनी केला.
MPSCच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. “MPSCच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर असून देवेंद्र फडणवीस हे सक्षमपणे त्यावर तोडगा काढतील,” असं ते म्हणाले.
निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि MPSC या सर्व संस्था चुकीच्या आणि फक्त संजय राऊतच बरोबर, अशी भूमिका किती योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “पराभव झाला की आयोगावर खापर आणि विजय झाला की गुलाल,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली.
कोरोना काळातील परिस्थितीचा संदर्भ देत बन यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. “कोरोना काळात देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयात होते, तर तुम्ही घरात बसून कोमट पाण्याचे सल्ले देत होता,” असा टोला त्यांनी लगावला. मंदिरं बंद असताना मदिरालयं सुरू असल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राऊतांना कोरोना काळाचा इतिहास विसरू नये, असा इशारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘गुजरात’च्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेलाही बन यांनी प्रत्युत्तर दिलं. “नरेंद्र मोदी फक्त गुजरातचे नाहीत. २०१४, २०१९ आणि २०२४मध्ये जनतेने त्यांना उत्तर दिलं आहे,” असं ते म्हणाले.
ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राऊतांना टोला लगावला. “DJचा आवाज मर्यादित ठेवा; मात्र संजय राऊतांचा रोजचा राजकीय भोंगा आधी बंद करा,” अशी टीका त्यांनी केली.
OBC आरक्षणावर बोगस प्रमाणपत्रांचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे जात पडताळणी समितीकडे द्यावेत, असं आव्हान बन यांनी दिलं. “आरोप नकोत, पुरावे द्या,” असं म्हणत त्यांनी राऊतांना थेट आव्हान दिलं.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही त्यांनी लक्ष्य केलं. वांग्याच्या उत्पादनातून कोट्यवधी रुपये कमावण्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत “करोडो कमावण्याचा वांगी फॉर्म्युला आधी महाराष्ट्राला सांगा,” असा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ भाषणं न करता ठोस उपाय सुचवावेत, अशी मागणीही नवनाथ बन यांनी केली.






