Satara Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचे जाळे सक्रिय! ‘म्यूल अकाउंट’द्वारे लाखोंचा डल्ला; तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
Satara Cyber Crime: कमिशनच्या आमिषाला बळी पडू नका: सायबर भामट्यांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यांचा 'काळा पैसा' फिरवण्यासाठी वापर; पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन.

Satara Cyber Crime – सातारा जिल्ह्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत (2026) सायबर गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, डिजिटल अरेस्ट, बनावट एपीके फाइल, ऑनलाइन ट्रेडिंग, तसेच ’म्यूल अकाउंट’च्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांची बँक खाती वापरून काळा पैसा फिरवत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
सायबर तज्ज्ञांच्या मते, ‘म्यूल अकाउंट’ म्हणजे सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा लपवण्यासाठी वापरले जाणारे बँक खाते होय. अनेकदा थोड्या कमिशनच्या आमिषाने किंवा ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली नागरिकांची बँक खाती वापरली जातात. अशा खात्यांमध्ये पैसे जमा झाल्यानंतर ते तत्काळ दुसर्या खात्यात वर्ग केले जातात किंवा एटीएममधून काढले जातात. तपासात सर्वप्रथम खातेदार अडचणीत येतो, तर मुख्य सूत्रधार पडद्यामागे राहतात.
सायबर गुन्हेगार सोशल मीडिया, टेलिग्राम, व्हॉट्सप, बनावट गुंतवणूक योजना, डिजिटल अरेस्ट, क्यूआर कोड आणि एपीके फाइलच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. त्यामुळे बँक खाते, ओटीपी, नेट बँकिंग पासवर्ड किंवा एटीएम पिन कोणालाही देऊ नये, तसेच अनोळखी व्यक्तींकडून आलेले पैसे दुसर्या खात्यात पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या तीन महिन्यांतील प्रमुख सायबर गुन्हे
कोरेगावमध्ये आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश (मे 2026) डिजिटल अरेस्टची भीती दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्या टोळीवर सातारा एलसीबी व कोरेगाव पोलिसांची धाड. 17 जण ताब्यात, 5 आरोपी अटकेत, सुमारे 35.34 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2) बनावट आरटीओ फाइलने 7.63 लाखांचा गंडा (जुलै 2026). व्हॉट्सपवर पाठविलेली बनावट एपीके फाइलफाईल उघडताच मोबाइल हॅक. 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून 7,63,600 रुपये लंपास.
उंब्रजमध्ये ’म्यूल अकाउंट’ प्रकरण (जुलै 2026) सायबर फसवणुकीची रक्कम एसबीआय खात्यात जमा करून चेकद्वारे काढल्याचा आरोप. महाराष्ट्र सायबर व एनसीआरपीच्या पडताळणीनंतर संबंधित खातेदारावर गुन्हा. शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने 1.40 कोटींची फसवणूक (मे-जून 2026) बनावट ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून 1 कोटी 40 लाखांची फसवणूक. पुणे सायबर पोलिसांची सातार्यातील अपशिंगे येथून संशयिताला अटक.
सायबर विभाग अॅक्शन मोडवर
सातारा जिल्हा पोलीस दलाचा सायबर विभाग वाढत्या डिजिटल गुन्ह्यांवर लक्ष ठेवून विविध प्रकरणांचा तपास वेगाने करत आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल, बँका आणि इतर तपास यंत्रणांच्या समन्वयातून संशयास्पद व्यवहारांवर कारवाई सुरू असून, नागरिकांमध्ये जनजागृती मोहिमांनाही गती देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे बँक खाते भाड्याने देऊ नये, ओटीपी किंवा बँकिंग माहिती कोणाशीही शेअर करू नये आणि संशयास्पद व्यवहार दिसताच तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा लूलशीलीळाश.र्सेीं.ळप या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे. सायबर गुन्ह्यांवर प्रभावी कारवाईसाठी जिल्हा पोलीस सज्ज असून नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.






