Digital arrest : सीबीआयची १६ राज्यांत छापेमारी; डिजिटल अरेस्ट प्रकरणी २ आरोपींना अटक
सायबर-आधारित फसवणुकीच्या २०० हून अधिक प्रकरणांशी संबंधित असलेल्या या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ऑपरेशन चक्र-६ अंतर्गत सीबीआयने ६० विशेष पथके तैनात केली होती.

Digital arrest – सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाशी (वेबसाईट) मिळतेजुळते यूआरएल वापरून शेकडो लोकांना डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात अडकवणाऱ्या एका टोळीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सीबीआयने १६ राज्यांमधील ८० ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
सायबर-आधारित फसवणुकीच्या २०० हून अधिक प्रकरणांशी संबंधित असलेल्या या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ऑपरेशन चक्र-६ अंतर्गत सीबीआयने ६० विशेष पथके तैनात केली होती.
या राज्यांचा विस्तार पश्चिमेकडील पंजाब आणि गुजरातपासून ते ईशान्येकडील आसाम आणि मणिपूरपर्यंत होता. या झडतीदरम्यान सीबीआयने मोबाईल फोन, डिजिटल उपकरणे, बँकिंग नोंदी आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले.
या कारवाईत चेन्नई आणि कोलकाता येथून बी. नरेश आणि संजीब साहा या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. फसवणूक, धमकावणे आणि तांत्रिक क्लृप्त्यांचा वापर करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा ते भाग होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेले संशयित आरोपी पैशांचा मागोवा (मनी ट्रेल) लपवण्यासाठी आर्थिक साचा तयार करण्यात गुंतले होते. यासाठी त्यांनी शेल कंपन्या स्थापन केल्या आणि म्युल बँक खाती उघडून ती चालवली.
गुन्ह्यातून मिळालेली अंदाजे दोन कोटी रुपयांची रक्कम मनी लाँड्रिंगद्वारे वळवण्यासाठी या खात्यांचा वापर केला गेल्याचे समजते. तसेच या गुन्हेगारी टोळीने भारतीय नागरिकांशिवाय परदेशी नागरिकांनाही लक्ष्य केले असावे, असे सीबीआयच्या प्रवक्त्याने म्हटले.





