Satara Police Action – नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन पुन्हा सक्रिय झाले आहे. सातारा शहरातील जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करण्यात येत आहे. सातारा शहर वाहतूक शाखेनेही रात्रीच्या वेळी नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केल्या. अशा कारवाया आता सातत्याने व्हाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सातारा बसस्थानकासमोरील बाजार समितीच्या पटांगणातील भिंतीच्या आडोशाला जुगाराचा खेळ सूरु होता. यांची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी संतोष जनार्दन शेेळके (वय 50, रा. शेळकेवाडी ता. सातारा), सुनील नारायण अवघडे (वय 33, रा. सैदापूर ता. सातारा), सोमनाथ चोरगे (रा. रविवार पेठ सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6 हजार 214 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. सदरबझार येथील भीमाबाई आंबेडकरनगर मधील कॅनॉलच्या शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगारावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून अशपाक गुलाब शेख (वय 36), तौसिफ मज्जिद शेख (दोघे रा. सदरबझार सातारा) यांना ताब्यात घेऊन 1 हजार 50 रुपये रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. गुरुवार परज येथील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगारावर छापा टाकून सातारा शहर पोलिसांनी मनोज संपतराव माने (वय 53, रा. बुधवार पेठ, सातारा) याला ताब्यात घेत 1 हजार 150 रुपये रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. परळी (ता. सातारा) गावच्या हद्दीत पडक्या घराच्या आडोशाला जुगाराचा खेळ सुरु होता. जुगार अड्डा. याची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून प्रतिक शंकर जाधव (वय 25), सोमनाथ भानुदास मनवे (वय 29, दोघे रा. पो. मानेवाडी अंबवडे ता. सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 61 हजार 500 रुपये किंमतीचा फोन, आयफोन, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जकातवाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीतील मोकळ्या शेडमध्ये जुगारावर छापा टाकून सातारा तालुका पोलिसांनी अभिजित अशोक चौगुले (वय 33), गणेश चंद्रकांत कु-हाडे (वय 43, दोघे रा. मंगळवार पेठ सातारा) यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 78 हजार 320 रुपये किंमतीचा की बोर्ड, सी. पी. यु, मॉनिटर, माऊस, मोबाइल फोन, मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला. नागेवाडी हद्दीत छापा टाकून निळकंठ शिवाजी सावंत (वय 48, रा. नागेवाडी ता. सातारा) याला ताब्यात घेत 760 रपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. वाहतूक शाखेचीही कारवाई सातारा शहरात रात्रीच्या वेळी अनेक जण दुचाकीला कर्कश हॉर्न लावून फिरत असतात. यांचा नागिरकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा याबाबत नागरिकांनी स्वत तक्रार करुही पोलिसांकडून लक्ष देण्यात येत नाही. मात्र, नवे पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी पदभार स्वीकारताच वाहतूक शाखाही सक्रिय झाल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. राजवाडा परिसरातील मोती चौकात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित यादव व वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करुन त्यांना सूचना देत होते. अचानक वाहनांवर कारवाई होत असल्याचे पाहून अनेक वाहनधारक मार्ग बदलून निघून गेले. सर्वत्र अचानक झालेल्या या कारवाईची चर्चा सुरु आहे.