Shambhuraj Desai: धरणांतील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवा! पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
Shambhuraj Desai: जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत पालकमंत्री देसाईंचे निर्देश; नदीकाठच्या गावांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन.

Shambhuraj Desai – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला असून, संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सतर्क राहून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पुराचे अतिरिक्त पाणी वाया जाऊ न देता ते कालवे आणि उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्यांतील तलाव,
बंधारे व जलसाठ्यांमध्ये वळविण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूरपरिस्थिती व आपत्कालीन उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देसाई बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
धरणांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाण्याचा विसर्ग करताना सखल भाग, नदीकाठची गावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कोणत्याही परिस्थितीत अचानक पूरस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी विसर्गाचे वैज्ञानिक आणि काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री देसाई म्हणाले, अतिवृष्टीमुळे नद्यांमध्ये वाहून जाणारे अतिरिक्त पाणी शक्य तितक्या प्रमाणात दुष्काळी भागाकडे वळवून तेथील तलाव, बंधारे आणि जलसाठे भरावेत. यामुळे पावसाळ्यानंतर उद्भवणार्या पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल आणि सिंचनासाठीही लाभ होईल. पाटण तालुक्यातील दरडप्रवण भागातील नागरिकांच्या पुनर्वसनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देताना त्यांनी ज्या गावांच्या पुनर्वसनासाठी अद्याप जागा निश्चित झालेली नाही,
त्या ठिकाणी संबंधित अधिकार्यांनी त्वरित क्षेत्रीय पाहणी करून योग्य जागेची निवड करावी आणि पुनर्वसन प्रक्रियेला गती द्यावी, असे स्पष्ट केले. अबदारवाडी परिसरात महामार्गाच्या कामांमुळे घरांमध्ये पाणी साचत असल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.
तसेच नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचे खोलीकरण व रुंदीकरण करून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. बैठकीत जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा, पूरनियंत्रणासाठीची तयारी, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तसेच विविध विभागांमधील समन्वयाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.






