Satara crime : साताऱ्यात भररस्त्यात मद्यपीकडून युवतीची छेड! राधिका रोडवर मध्यरात्री उडाला गोंधळ
Satara crime : साताऱ्यातील राधिका रस्त्यावर सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडला संतापजनक प्रकार; मद्यधुंद युवकाने तरुणीला गाठून काढली छेड, परिसरात तणाव.

Satara crime – साताऱ्यातील राधिका रस्ता परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या एका प्रकाराने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाईन शॉपीसमोर मद्यधुंद अवस्थेतील एका युवकाने जाणाऱ्या युवतीची छेड काढल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे संबंधित युवती भयभीत झाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठच्या सुमारास एक युवती राधिका रोडवरून जात असताना मद्यधुंद अवस्थेतील युवकांनी किरकोळ कारणावरून तिची छेड काढली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे युवतीने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. याचवेळी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे पेट्रोलिंग करत असताना त्यांचे या घटनेकडे लक्ष गेले.
त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे पुढील अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेमुळे राधिका रस्त्यावरील वाईन शॉपी परिसरातील वाढत्या अनधिकृत मद्यविक्री व मद्यपानाच्या प्रकारांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. वाईन शॉपीलगत काही टपऱ्यांवर अनधिकृतपणे मद्यपानाची सोय उपलब्ध करून दिली जात आहे.
त्यामुळे रात्री उशिरापर्यंत येथे मद्यपींची गर्दी होत असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना या मार्गाने ये-जा करताना असुरक्षित वाटते, असे परिसरातील नागरिक सांगत आहेत. केवळ किरकोळ कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या अनधिकृत टपऱ्या व मद्य अड्ड्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.





