Girl Kidnapping Case – कोरेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः पालकवर्गामध्ये अस्वस्थता आणि संताप वाढताना दिसत आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना, पोलीस दलाच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अलीकडेच चंचळी, ता. कोरेगाव येथे घडलेली घटना या परिस्थितीची तीव्रता अधोरेखित करणारी ठरली आहे. १७ वर्षीय मुलीचे दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भेगडे करत असून, अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोरेगाव पोलीस ठाणे. मात्र, वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केवळ आश्वासनांवर समाधान न मानता ठोस आणि परिणामकारक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनवला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ आणि कठोर पावले उचलणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा, नागरिकांचा असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांवरील विश्वास डळमळीत गेल्या काही महिन्यात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावोगावी संशयास्पद हालचाली वाढल्या असून, पोलिसांची दिवसा आणि रात्रीची गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अपुरी पडत असल्याची टीका होत आहे. यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत चालला आहे. वारंवार घडणाऱ्या अपहरणाच्या घटनांमुळे पालक आपल्या मुलींच्या सुरक्षेबाबत अधिकच सावध झाले आहेत. शाळा, महाविद्यालय किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या मुलींना एकटे पाठवताना पालकांना भीती वाटत आहे. उपाययोजना राबवण्याची गरज या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केवळ तपासापुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे. नियमित गस्त वाढवणे, संवेदनशील भागात सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करणे, संशयितांवर तातडीने कारवाई करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विशेष सुरक्षा पुरवणे, या उपाययोजना तातडीने अमलात आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.