Hit and Run – खडकवासला भागात शनिवारी मद्यधुंद चालकाच्या वाहनांने धडक दिल्याने दुचाकीवरील चार वर्षांचा बालकाचा मृत्यू झाला. मद्यधुंद चालकाने अन्य दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. पसार होण्याच्या तयारीतील मद्यपी चालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाले. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी चालकाला अटक केली. यशराज निलेश कांबळे ( ४, रा. धायरी) या बालकाचा अपघातात मृत्यू झाला. दुचाकीस्वार निलेश कांबळे ( ३६) आणि त्यांची पत्नी जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड सिटी पोलिसांनी चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे ( ३६, रा. अहिल्यानगर) याला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, निलेश कांबळे हे भाजीपाला विक्रेते आहेत. खडकवासला भागात ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी (१६ मे) सायंकाळी साडेपाचला कांबळे, त्यांचा मुलगा यशराज आणि पत्नी हे दुचाकीवरुन खडकवासल्याहून पुण्याकडे निघाले होते. खडकवासला भाजी मंडई परिसरात भरधाव कारने कांबळे यांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी, तसेच चारचाकी वाहनाला कारने धडक दिली. कार न थांबवता चालक अमोल हा पसार होण्याच्या तयारीत होता.अपघातानंतर खडकवासला भाजी मंडई परिसरात नागरिकांची गर्दी झाली. नागरिकांनी पाठलाग करुन चालकाला पकडले. नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाताच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. गंभीर जखमी झालेल्या यशराजसह त्याच्या आई-वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान यशराजचा मृ्त्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक कसबे तपास करत आहेत. आरोपी मोटारचालक अमोल याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.