पुण्यातील किडनी रॅकेटमध्ये ससूनचा तत्कालीन अधीक्षक डॉ. तावरे होणार सह-आरोपी

पुणे – पुणे शहरात सन २०२२ मध्ये गाजलेल्या किडनी रॅकेट प्रकरणात एक खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. या रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. त्याला आता दाखल असलेल्या गुन्हयामध्ये सह आरोपी करण्यात येणार आहे.
दरम्यान प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या रॅकेट प्रकरणात नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधिशांच्या चौकशी समितेने तेव्हा डॉ.तावरे याचा सहभाग निश्चीत केला होता. तसा अहवालही सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होताना तो रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय तज्ञ, दलाल, रुग्ण आणि दात्यावर दाखल झाला. डॉ. अजय तावरे मागील वर्षभरापासून पोर्शे कार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला मागिल वर्षभरात जामिन ही मिळाला नाही. त्याला कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात किडनी रॅकेट संदर्भात दाखल असलेल्या गुन्हयात सह आरोपी करण्यात येणार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोर्शे कार प्रकरणातून वर्ग करुन घेण्यात येणार आहे.
रॅकेटमध्ये होते तब्बल पंधरा आरोपी –
किडनी रॅकेट प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तब्बल १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाता अमित साळुंखे, दाता सारीका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड, अभिजित मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ.परवेज ग्रॅंट, रेबेका जॉन (उप संचालक, रुबी हॉल), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ.अभय सद्रे, डॉ.भुपत भाटी,डॉ.हिमेश गांधी, समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता. याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ.संजोग सिताराम कदम यांनी तक्रार दिली होती.
असा सापडला डॉ.तावरे जाळ्यात –
किडनी रॅकेट प्रकरणात डॉ.तावरे हा एफआयआर मधून स्वत:चे नाव वगळण्यात यशस्वी झाला होता. मात्र पोर्शे कार प्रकरणात तो चांगलाच अडकला. दरम्यान जुन्या गुन्हयांचे निर्गतीकरण करताना पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्हयातील समितीचा अहवाल वाचणात आला. त्यात डॉ. तावरेचे नाव असतानाही गुन्हा दाखल नसल्याचे दिसले. यामुळे पोलिसांनी प्रकरणाच्या पुन्हा मुळाशी जाऊन तपास केला. तेव्हा डॉ. तावरे याचीच प्रत्यारोपनात मुख्य भुमिका असल्याचे उघड झाले. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने डॉ. तावरेला सह आरोपी करण्याच्या दुष्टीने पावले उचलली. त्याच्यावर एक दोन दिवसांत गुन्हा दाखल होऊ शकतो.





