“ससून’मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; फर्निचर बिलासाठी 1 लाखाची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले

पुणे – बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (ससून) फर्निचरच्या कामाच्या बिलाला मंजुरी मिळवण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक आणि कार्यालयीन अधीक्षकाने १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तडजोडीअंती १ लाख रुपये स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी, २ एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले.
या प्रकरणात जयंत पर्वत चौधरी (वय ४९, वरिष्ठ सहाय्यक) आणि सुरेश विश्वनाथ बोनवळे (वय ५३, कार्यालयीन अधीक्षक) यांच्यावर कारवाई झाली आहे. एका ३२ वर्षीय फर्निचर सप्लायर व्यावसायिकाने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारदाराने २०२३ मध्ये ससून महाविद्यालयाला २० लाख रुपयांचे फर्निचर पुरवले होते. यापैकी १० लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी बोनवळे आणि चौधरी यांनी १३ टक्के म्हणजेच १ लाख ३० हजारांची लाच मागितली होती.
एसीबीला १ एप्रिल रोजी तक्रार मिळाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. यात बोनवळे यांनी लाचेची रक्कम चौधरी यांच्याकडे स्वीकारण्यास सांगितल्याचे उघड झाले. त्यानुसार, बुधवारी महाविद्यालयाच्या कार्यालयात तक्रारदाराकडून चौधरी यांनी १ लाख रुपये घेतले. याच वेळी एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, तर पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत. या घटनेमुळे ससूनमधील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे.




