पुणे – बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयातील २३५ प्रशिक्षणार्थी (इंटर्नशिप) डॉक्टरांना तीन महिन्यांपासून विद्यावेतन (स्टायपंड) मिळाले नाही. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी मंगळवारी (दि. १५) मुख्य इमारतीसमोर संप पुकारून निदर्शने केली. त्यावर प्रशासनाने तत्काळ चर्चा करीत आठवडाभरात वेतन करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयात २३५ प्रशिक्षणार्थी (इंटर्नशिप) डॉक्टर आहेत. या डॉक्टरांना दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. मात्र, ते नियमानुसार मिळणे अपेक्षित आहे. मात्र, ५ एप्रिलपासून हे विद्यावेतन प्रलंबित आहे. त्यामुळे या डॉक्टरांना आर्थिक झळ बसत आहे. याबाबत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले की, प्रशिक्षणार्थी (इंटर्नशिप) डॉक्टरांनी त्यांचे प्रशिक्षण एप्रिलमध्ये सुरू झाले. परंतु, प्रशिक्षणाचे अर्ज भरून देण्यास ३१ मेपर्यंत विलंब केला आहे. परिणामी, विद्यावेतनाची प्रक्रिया सुरू होण्यास जून महिना उजाडला. जूनमध्ये त्यांच्या विद्यावेतनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या आठवड्यात सर्व प्रशिक्षाणार्थी डॉक्टरांना प्रलंबित विद्यावेतन दिले जाईल.