जामखेड – मागील खर्चाचा हिशेब मागतो, म्हणून झालेल्या वादाच्या कारणावरून सरपंच व उपसरपंचाचे पती यांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली होती. त्या वेळी केलेल्या मारहाणीत मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान सदस्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात सरपंचासह दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा रावसाहेब रावण (वय 52, रा. घोडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा गणेश रावसाहेब रावण (वय 32) हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता. परंतु एक वर्ष झाले तरी सरपंच शरद जगताप याने राजीनामा न दिल्यामुळे मृत गणेश रावण व सरपंच शरद जगताप यांच्यात सतत भांडणे होत होते.
यानंतर दि. 30 जून 2023 रोजी गणेश हा सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतमध्ये सभेसाठी गेला होता. नंतर दुपारी तो घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्यावर झोपलेला दिसला. याचे कारण विचारले असता त्याने डोके दुखत आहे, असे सांगितले. डोके दुखण्याचे कारण विचारले तर त्याने सांगितले की, ग्रामपंचायतमध्ये सरपंच शरद जगताप, उपसरपंचाचे पती शमशाद शौकत मुलानी, ग्रामसेवक रामदास गोरे हजर होते. या वेळी मागील खर्चाचा हिशेब मागितल्यावरून सरपंच शरद जगताप व शौकत सैदु मुलानी आले.
मोटरसायकल आडवी लावून तू हिशेब मागतो काय म्हणत शिवीगाळ करत आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही, म्हणून शौकत मुलानी व जगताप याने मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला मार लागला. या वेळी जालिंदर कल्याण भोंडवे हे जवळून जात असताना त्यांनी आमचे भांडण सोडवले. मला झालेल्या मारहाणीमुळे माझे डोके दुखत आहे, असे सांगितले.
यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी गणेशने उलटी केली.
यानंतर गणेश यास येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. नंतर नगरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले.उपचारादरम्यान दि. 2 जुलै रोजी सकाळी गणेश मृत झाला. यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये वैद्यकीय अहवालावरून दि. 25 ऑगस्टला मृत गणेशची आई रेखा रावसाहेब रावण (वय 52, रा. घोडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.