Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड सुटणार अन् त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार अशा अफवा; धनंजय देशमुखांची तक्रार

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांना नवे संकट उभे राहिले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज (१६ डिसेंबर) उर्वरित युक्तिवाद होणार आहे. शुक्रवारी अर्धवट राहिलेल्या सुनावणीनंतर आज निकालाची शक्यता वर्तवली जात आहे.
या सुनावणीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख कुटुंबीयांसह न्यायालयात हजर झाले आहेत. माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे सांगितले, मात्र आरोपींच्या समर्थकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
धनंजय देशमुख म्हणाले की, आरोपी सुटणार आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार, अशा अफवा पसरवून कुटुंबाला भयभीत करण्याचा प्रयत्न होत आहे. हे चुकीचे आहे. राज्यातील सर्व १८ पगड जाती-जमातींचा समाज संतोष देशमुखांसोबत उभा आहे, कारण एका निष्पाप माणसाला क्रूरपणे संपवले गेले.
धनंजय देशमुख पुढे म्हणाले, आम्ही न्यायाच्या बाजूने आहोत. एसआयटी, मुख्यमंत्री आणि न्यायालयावर विश्वास ठेवून आम्हाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे. आरोपींचे समर्थक अशा वल्गना करतात, तर त्यांना कायद्याची कडक कारवाई दाखवली पाहिजे. मुख्य आरोपी वाल्मीक कराडची जामीन अर्जावर १२ डिसेंबरला सुनावणी झाली होती आणि आज उर्वरित युक्तिवाद होईल, असं धनंजय देशमुख म्हणाले.
मारहाणीचे व्हिडीओ न्यायालयात सादर
या प्रकरणात सरकारी वकिलांनी वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद केला आहे. मारहाणीचे व्हिडीओ न्यायालयात दाखवले गेले, ज्यामुळे कुटुंबीय भावुक झाले होते. मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याने जामीन मिळणे कठीण मानले जात आहे. मात्र, आरोपींच्या समर्थकांकडून होणाऱ्या अरेरावीमुळे तणाव वाढला आहे.
संतोष देशमुख यांची हत्या खंडणीप्रकरणाशी जोडली गेली आहे. आवादा कंपनीकडून २ कोटींची खंडणी मागितली गेली आणि विरोध करणाऱ्या देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबाचा संघर्ष सुरू राहणार आहे. सर्वांचे लक्ष आजच्या सुनावणीच्या निकालाकडे लागले आहे.




