Pune News | गणेश विसर्जन मिरवणूक संपली ; आता महापालिकेची ‘स्वच्छता मोहीम’ सुरू

प्रभात वृत्तसेवा
पुणे : गणेशोत्सव मिरवणूक संपताच महापालिकेने मिरवणूक मार्गांच्या स्वच्छतेला सुरुवात केली. स्वच्छतेसाठी पालिकेने ३ हजार कर्मचारी तैनात केले असून लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि मध्यवर्ती पेठांतील मुख्य रस्त्यांची स्वच्छता सुरू केल्याचे पालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.शनिवार सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली. या मिरवणुकीत लाखो भाविकांनी हजेरी लावली. रविवारी रात्रीपर्यंत मिरवणूक सुरूच होती.
ज्या प्रमुख रस्त्यांवर मिरवणूक संपल्याचे पोलिसांनी जाहीर केले त्या रस्त्यांवर पालिकेने तत्काळ स्वच्छता सुरू केली. उत्सवातही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर तात्पुरते स्टॉल सुरू केले होते. त्यांच्याकडून राहिलेले खाद्यपदार्थ, कचरा तसेच पाण्याच्या बाटल्या रस्त्याच्या कडेला टाकल्या होत्या. याशिवाय, रस्त्यावर कपडे, तुटलेल्या चपला तसेच इतर साहित्याचा खचही पडला होता. रविवारी रात्रीही स्वच्छता सुरू होती असे उपायुक्त कदम यांनी स्पष्ट केले.
पावसाचा अडथळा..
रविवारी दुपारी शहरात पाऊस झाला. त्यामुळे अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यात उधळण्यात आलेला गुलाल तसेच रांगोळीमुळे रस्त्यावर लाल चिखल झाला होता. पावसामुळे सुका कचरा भिजल्याने तो उचलताना कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. तसेच अनेक मंडळांकडून कॅननमधून कागदाचे कपटे उडविण्यात आले होते. तेही पावसामुळे रस्त्यावर चिकटून राहिल्याने झाडताना कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.





