Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: चला पंढरीसी जाऊं…! ’माऊली… माऊली’च्या जयघोषात, वरुणराजाच्या सरी झेलत पालखीचे प्रस्थान
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: इंद्रायणी नदीच्या पूरस्थितीमुळे यंदाचा प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत; केवळ अधिकृत दिंड्यांमधील २ हजार वारकऱ्यांनाच प्रवेश.

चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥
डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥
संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi – माऊली… माऊली, ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने बुधवारी सायंकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. वरुणराजाच्या सरी अंगावर झेलत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात प्रस्थान सोहळा अत्यंत उत्साहात, मात्र पूरस्थितीमुळे मर्यादित वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. पहाटे घंटानाद, काकड आरती, पवमान अभिषेक, श्रींना महानैवेद्य त्यानंतर दुपारी 12 वाजता स्वकाम सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ केला.
अडीच वाजता पहिली दिंडी मंदिरात आली. क्रमाने रथपुढील 27 आणि रथामागील 20 दिंड्या, अश्व मंदिरात आले. दिंडी आणि अश्व यांनी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत प्रदक्षिणा केली. वीणा मंडपात श्रींच्या चल पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. मानाची पागोटी प्रदान आदी धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर समाधी मंदिर परिसरात संस्थानतर्फे मानकर्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. आरती होऊन सायंकाळी सुमारे सहा वाजता पालखी वीणा मंडपातून बाहेर आली.
मंदिर प्रदक्षिणा करून पावणेसात वाजताच्या सुमारास महाद्वारातून बाहेर येऊन भराव रस्ता, भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारुती, चावडी चौक व महाद्वार चौक मार्गे दर्शन मंडपातील गांधीवाडा येथे पालखी पहिल्या मुक्कामासाठी विसवली. त्यानंतर समाजआरती संपन्न झाली. रिमझिम पावसातही वारकर्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भजनी मंडळे टाळ-मृदंगाच्या तालावर नाचत-गात पुढे सरकत होती. फुगड्या, रिंगणासारखे पारंपरिक वारकरी खेळ, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण आळंदी नगरी भारावून गेली होती.
यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ड. रोहिणी पवार, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनोद पाटील यांच्यासह मानकरी, खांदेकरी, ग्रामस्थ व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पूरस्थितीमुळे मर्यादित उपस्थितीत प्रस्थान
इंद्रायणी नदीच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. माऊली मंदिर संस्थान व प्रशासनाने भाविकांना आळंदीत न येण्याचे आवाहन केले होते. संस्थानच्या नियोजनानुसार रथापुढील 27, रथामागील 20 आणि पोटभागातील दिंड्यांतील वारकर्यांनाच प्रवेश देण्यात आला. दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी, कर्मचारी, पोलीस, आरोग्य व स्वच्छता विभागासह सुमारे दोन हजारावर जणांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पडला.
पर्यायी मार्गाची तयारी
गांधीवाडा येथे पहिला मुक्काम झाल्यानंतर गुरुवारी (दि. 9) सकाळी 6 वाजता पालखी पुणे मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, पुरामुळे पालखी मार्गावरील पुलाचे नुकसान झाल्याने त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू आहे. पूल वाहतुकीसाठी उपलब्ध न झाल्यास पालखी मरकळ मार्गे चर्होलीकडून पुणे रस्त्यावर येऊन पुढील प्रवास करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.






