Alandi News: ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात आळंदी दुमदुमली; मानाच्या बैलजोडीची शाही मिरवणूक उत्साहात
Alandi News: आषाढी पालखी सोहळ्याची लगबग सुरू; रानवडे परिवाराच्या मानाच्या बैलजोडीची शाही मिरवणूक उत्साहात संपन्न.

Alandi News – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील वैभवशाली चांदीच्या रथाला आळंदीतील शेतकरी तुळशीराम रानवडे, हर्षवर्धन रानवडे यांच्या वतीने जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीची शाही मिरवणूक रविवारी आळंदीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली. हलगी, बॅण्ड, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यंदाच्या पालखी सोहळ्यात मानाच्या बैलजोडीचा मान शेतकरी तुळशीराम रानवडे, हर्षवर्धन रानवडे आणि उमेश रानवडे यांना मिळाला आहे. त्यांच्या बैलजोड्या अनुक्रमे पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वैभवशाली चांदीच्या रथाची सेवा बजावणार आहेत. स्वामींच्या मठाजवळ आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजनाथ, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार तसेच बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत मानाच्या बैलजोडीचे विधीवत पूजन करण्यात आले.
चाकण चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रदक्षिणा मार्गे मार्गक्रमण करत मिरवणुकीचा समारोप महाद्वार चौकात झाला. समारोपानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर समितीच्या वतीने मानाच्या बैलजोडीचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, उपाध्यक्ष शिवाजी रानवडे, समिती सदस्य विलास घुंडरे,
नंदकुमार कुऱ्हाडे, रामचंद्र भोसले, ज्ञानोबा वहीले, नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, यांच्यासह आळंदीतील ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकरी संप्रदायात माऊलींच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीला विशेष धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. ही सेवा मिळणे हा रानवडे परिवारासाठी गौरवाचा आणि भक्तिभावाचा क्षण मानला जात असून, यंदाच्या शाही मिरवणुकीने आषाढी पालखी सोहळ्याच्या उत्साहात अधिकच भर घातली.





