Sanju Samson World Record : संजू सॅमसनचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० विश्वचषकात ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
Sanju Samson World Record : या खेळीदरम्यान संजूने अनेक प्रस्थापित विक्रम केले. मात्र, त्याने एक असा विश्वविक्रम नावे केला आहे, जो आजवर कोणालाही जमला नव्हता.

Sanju Samson World Record 108 Minutes : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये संजू सॅमसनने आपल्या बॅटने केवळ सामन्याचे चित्रच बदलले नाही, तर टीकाकारांची तोंडेही बंद केली आहेत. ज्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, त्याच संजूने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९७ धावांची खेळी करून भारताला ५ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान संजूने अनेक प्रस्थापित विक्रम केले. मात्र, त्याने एक असा विश्वविक्रम नावे केला आहे, जो आजवर कोणालाही जमला नव्हता.
संजूने १०८ मिनिटे खेळपट्टीवर मांडला ठिय्या –
संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चक्क १०८ मिनिटे खेळपट्टीवर घालवली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने एका डावात इतका वेळ फलंदाजी केलेली नाही. यापूर्वी हा विक्रम स्कॉटलंडच्या जॉर्ज मंसेच्या नावावर होता, ज्याने विंडीजविरुद्ध १०६ मिनिटे फलंदाजी केली होती. संजूने आता डेव्हन कॉन्वे (१०६ मिनिटे), पाथुम निसंका (१०५ मिनिटे) आणि मोहम्मद रिझवान (१०५ मिनिटे) या सर्वांना मागे टाकून अव्वल स्थान गाठले आहे.
विराट कोहलीचा ‘तो’ मोठा रेकॉर्ड मोडीत –
संजूने या खेळीसह भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक अत्यंत महत्त्वाचा विक्रम मोडला आहे. टी-२० विश्वचषकात लक्षाचा पाठलाग करताना भारतासाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम आता संजूच्या नावे झाला आहे. यापूर्वी विराटने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ८२ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती, मात्र संजूने आता नाबाद ९७ धावा करत विराटला मागे टाकले आहे.
यष्टीरक्षक फलंदाज म्हणूनही नवा विक्रम –
संजू सॅमसन आता टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. या प्रकरणात त्याने इशान किशनला पछाडले आहे. संजूच्या या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषकाच्या इतिहासातील आपले सर्वात मोठे लक्ष्य यशस्वीरित्या साध्य केले असून दिमाखात सेमीफायनल गाठली आहे.






