Sanjay Raut : संजय राऊतांचा राजकारणातून ब्रेक; स्वतः दिली मोठी माहिती, वाचा….

Sanjay Raut Health updates । Sanjay Raut : शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार ‘संजय राऊत’ यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेत आहे. दरम्यान, राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संजय राऊत यांनी काहीवेळापूर्वीच आपल्या ट्विटर हँडलवर एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे. संजय राऊतांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय? यावर एक नजर टाकुयात…
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती.. जय महाराष्ट्र !
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.! असं संजय राऊत आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
‘संजय राऊत’ शिवसेनेची धडाडती तोफ !
संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत.
ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत एकहाती करत असतात. संजय राऊत यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठाकरे गटासाठी अक्षरश: एकहाती खिंड लढवली आहे. राजकारणाबरोबरच समाजकारण आणि मराठी अस्मिता जपण्यावर त्यांचा भर आहे.





