Sanjay Raut: बंगालमधील ईव्हीएमला भाजप सरकारकडून आग; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Sanjay Raut: पश्चिम बंगाल निवडणुकीतील ४ हजार ईव्हीएम मशिन्स सरकारी इमारतीत जळून खाक झाल्याच्या घटनेवरून शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक.

Sanjay Raut – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या तब्बल चार हजार ईव्हीएम मशिन्स सरकारी इमारतीत अचानक जळून खाक होतातच कशा? या मशिन्स आपोआप जळाल्या नसून, निवडणुकीतील घोटाळ्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी भाजप सरकारनेच त्यांना आग लावली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शनिवारी (दि. १३) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राऊत म्हणाले, की पश्चिम बंगालचा निकाल कोणालाही मान्य होण्यासारखा नाही. ममता बॅनर्जी यांचा इतका मोठा पराभव होऊ शकत नाही. मतमोजणीत गडबड असल्याचा संशय विरोधी पक्षांना आधीपासूनच होता, तो या आग दुर्घटनेमुळे आता पूर्णपणे खरा ठरला आहे. देशात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे सरकार आल्यापासून राजकारणातील विकृतीने कळस गाठला आहे. पक्ष फोडणे आणि लोकप्रतिनिधींना विकत घेणे, हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे.
यामुळे महाराष्ट्रासारखे सुसंस्कृत राज्य भाजपने नासवून टाकले आहे. स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र, मराठी माणसांचे प्रश्न किंवा हिंदुत्व यापैकी एकाही लढ्यात भाजप कधीच नव्हती. काँग्रेसच्या कामाच्या एक टक्का तरी काम त्यांनी करून दाखवावे. हे केवळ डरपोक लोक आहेत अशी टीका करत, यांच्याविरुद्ध जनता योग्य वेळी रस्त्यावर उतरून बंड करेल, असा इशारा राऊत यांनी दिला. त्यासाठी काँग्रेस मजबूत होणे आणि सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, निवडणुकांनंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी आमदारांना ५०-५० कोटी रुपयांची आमिषे दाखवली जात असून, यंत्रणांमार्फत दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप करत १५ लाख कोटींचा घोटाळा करणारा राजेश मेहता हा भाजपचाच माणूस असून, पंतप्रधान मोदी हे त्याच्याबरोबर फोटोबाजी करताहेत. प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपेट्या भाजपच्या काळात चोरल्या जात असून, भाजपच्या नेत्यांनी कधीतरी यावरही बोलावे.
शिंदेंचा पक्ष फडणवीस यांच्या ऑपरेशन टेबलवर
शिंदे गट सरळ मार्गाने जन्माला आलेला नसून तो अमित शाह यांचाच पक्ष आहे. ऑपरेशन टायगरची हवा काढताना अमित शाह यांनी शिंदेंचे शंभरवेळा ऑपरेशन केले आहे. आता तर शिंदेंचा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑपरेशन थिएटरच्या टेबलावर आला असून, फडणवीस कधी त्यांचे ऑपरेशन करतील हे त्यांना समजणारही नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.






