EVM Machines Burnt : बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम जळून खाक; एफआयआर दाखल
पश्चिम बंगालमधील एका सरकारी इमारतीला लागलेल्या आगीत सुमारे ४ हजार ईव्हीएम जळून खाक (EVM Machines Burnt) झाल्याची माहिती राज्याचे मंत्री कौशिक चौधरी यांनी गुरुवारी दिली.

EVM Machines Burnt : पश्चिम बंगालमधील एका सरकारी इमारतीला लागलेल्या आगीत सुमारे ४ हजार ईव्हीएम जळून खाक (EVM Machines Burnt) झाल्याची माहिती राज्याचे मंत्री कौशिक चौधरी यांनी गुरुवारी दिली. या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दक्षिण कोलकातामधील अलिपूर भागात असलेल्या नऊ मजली इमारतीला बुधवारी भीषण आग (EVM Machines Burnt) लागली होती. या इमारतीत इतर विभागांशिवाय दक्षिण २४ परगणा जिल्हा परिषदचे कार्यालयही होते. या आगीत सुमारे ४,००० ईव्हीएम नष्ट झाल्या आहेत. या ईव्हीएमचा वापर या वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान १० मतदारसंघांमध्ये करण्यात आला होता.
घटनास्थळाला भेट दिल्यानंतर चौधरी म्हणाले, ही काही सामान्य आग वाटत नाही. यात काही घातपात झाला आहे का? याची आम्ही तपासणी करत आहोत. आग नवव्या आणि दहाव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही आग सर्वप्रथम दिसून आली. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यांना कोणताही फटका न बसता ती सातव्या आणि आठव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली? या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
घटनेची अधिक स्पष्ट कल्पना येण्यासाठी ते फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहोत, असे चौधरी म्हणाले. दरम्यान, दक्षिण २४ परगणा प्रशासनाने या घटनेच्या चौकशीची मागणी करत अलिपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. ही आग विद्युत बिघाडामुळे लागली की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास अधिकारी करत आहेत. अद्याप आगीचे कोणतेही निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी घातपाताची (EVM Machines Burnt) शक्यता नाकारता येणार नाही असे म्हटले, तर भाजप नेते राकेश सिंग यांनी ही आग म्हणजे एक सुनियोजित कृत्य असल्याचा आरोप केला. मात्र, अशा दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही.






