Sanjay Manjrekar Statement : “आधी जैस्वालला फोन करा अन् माफी मागा!”; रोहितच्या निवडीवरून संतापलेल्या माजी खेळाडूने निवड समितीला सुनावलं
Sanjay Manjrekar Statement : भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मते, यशस्वी जैस्वालला एकदिवसीय संघातून वगळून भारतीय संघाच्या निवड समितीने योग्य निर्णय घेतलेला नाही, त्यांनी पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या खेळाडूला संघात स्थान दिले आहे.

Sanjay Manjrekar Bold Statement on Yashasvi Jaiswal : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर हे त्यांच्या रोखठोक आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. मांजरेकर यांनी पुन्हा एकदा एक असे खळबळजनक विधान केले आहे, ज्याने बीसीसीआयच्या निवड समितीला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मांजरेकर यांच्या मते, भारतीय निवडकर्त्यांनी यशस्वी जैस्वालची जाहीर माफी मागितली पाहिजे. जैस्वालवर वनडे संघातून वगळून मोठा अन्याय झाला आहे. त्याला रोहित आणि विराटसारख्या दिग्गज खेळाडूंच्या तोडीस तोड धावा करण्यासाठी फक्त १० डावांची गरज आहे, असा दावा मांजरेकर यांनी केला आहे.
“फिट नसलेल्या ज्येष्ठ खेळाडूसाठी जैस्वालवर अन्याय!”
निवड समितीवर तोफ डागताना संजय मांजरेकर म्हणाले, “निवडकर्त्यांनी वनडे संघात अशा एका ज्येष्ठ खेळाडूला स्थान दिले आहे, ज्याच्या फिटनेसवर मोठे प्रश्नचिन्ह आहे आणि जो सध्या फॉर्मातही नाही. जर निवडकर्त्यांना असे वाटत असेल की ते रोहित शर्माला संघात निवडण्यासाठी हतबल किंवा मजबूर आहेत, तर त्यांनी सर्वात पहिले काम हे केले पाहिजे की, यशस्वी जैस्वालला फोन करून त्याची माफी मागितली पाहिजे. जैस्वालला वनडे क्रिकेटमध्ये सलग १० डावांची संधी देऊन बघा, त्याचे आकडेही विराट कोहली आणि रोहित शर्मासारखेच असतील.”
शतक ठोकूनही जैस्वाल वनडे संघातून आऊट!
🚨Sanjay Manjrekar slammed the team selectors🚨
Sanjay Manjrekar said:🗣️
“Sai Sudarshan has done well in the shorter formats. Yashasvi Jaiswal scored a century in his last ODI, but these guys aren’t representing the country. The selectors have chosen an experienced player who… pic.twitter.com/0FM0ABMFm6
— Shanu (@Shanu_3010) May 26, 2026
अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून यशस्वी जैस्वालला धक्कादायकरित्या बाहेर ठेवण्यात आले आहे, तर संघात इशान किशनचे पुनरागमन झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याचा संघात समावेश केला गेला आहे. यशस्वी जैस्वालने आपल्या शेवटच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे नाबाद ११६ धावांची खेळी साकारली होती. तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता. मात्र, एवढी उत्कृष्ट कामगिरी करूनही त्याला थेट संघातून डच्चू देण्यात आला आहे.
जैस्वालची उत्कृष्ट कारकीर्द; तरीही टी-२० आणि वन-डे मधून पत्ता कट!
यशस्वी जैस्वालला आतापर्यंत केवळ ४ वन-डे सामन्यांमध्ये संधी मिळाली असून, त्याने ५७ च्या उत्कृष्ट सरासरीने १७१ धावा केल्या आहेत. तो केवळ वन-डे मधूनच नाही, तर भारताच्या टी-२० संघातूनही बाहेर आहे. जैस्वालने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६ च्या सरासरीने आणि १६० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने ७२३ धावा कुटल्या आहेत. सध्या त्याला केवळ कसोटी क्रिकेटपुरते मर्यादित ठेवण्यात आले असून, २८ कसोटी सामन्यांत त्याने ७ शतकांच्या मदतीने ४९.२ च्या सरासरीने २५११ धावा केल्या आहेत. अशा या तिन्ही फॉरमॅटमधील हुकमी एक्क्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाहेर ठेवल्याने मांजरेकरांनी निवड समितीवर जोरदार टीका केली आहे.





