Sangram Thopate | काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. ज्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज संग्राम थोपटे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. भोरमधील शिवतीर्थ चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संग्राम थोपटे कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. संग्राम थोपटेंनी सांगितले काँग्रेस सोडण्यामागचं कारण दरम्यान, संग्राम थोपटे यांनी २० एप्रिल रोजी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस सोडताना मनात असलेली खदखद व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले होते की, ‘काँग्रेस सोडताना मनात दुःख आहे. पण ही वेळ पक्षानेच आणली आहे. पक्षाने मला संधीच दिली नाही. अनेक वेळा मला डावलण्यात देखील आले. २०१९ साली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळाली होती. मला संधी मिळेल अशी भावना होती. पण तेव्हा मला संधी मिळाली नाही”, असंही ते म्हणाले. Sangram Thopate | “नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाही मला संधी मिळाली नाही. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून गेल्यानंतर विरोधीपक्ष नेतेपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण तेव्हाही संधी मिळाली नाही. राजकीय दृष्टिकोनातून पक्ष ताकद देत नव्हता म्हणूनच मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की भाजपमध्येच आपल्याला न्याय मिळू शकेल. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे”, असं संग्राम थोपटे यांनी सांगितलं होते. दरम्यान, संग्राम थोपटे गेली तीन टर्म आमदार होते. पण गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने ते अस्वस्थ होते. काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता संग्राम थोपटे हे देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. Sangram Thopate | हेही वाचा: ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?