ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?

पुणे : गेल्या पंधरवड्यात शरद पवार आणि अजित पवार हे तीनवेळा एकत्र आले आहेत. सोमवारीही (दि. २१) येथील साखर संकुलमधील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) कार्यालयामध्ये ‘कृषी क्षेत्रात एआयचा वापर’ या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बैठकीला कृषीमंत्र्यांसह अजित पवार आणि शरद पवारही उपस्थित राहिले.त्यांच्यामध्ये अर्धा तास खलबतं झाली. त्यामुळे दोन्ही पवारांमधील दुरावा संपुष्टात येऊन अधिकची जवळीकता वाढल्याने ते दोघे पुन्हा एकत्र येणार का? यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता पवार काका- पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांतील अजित पवार आणि शरद पवारांची ही चौथी भेट होती. त्यामुळे त्यामुळे काका-पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्या कशा जाणून घेऊयात.
अजित पवार शरद पवारांच्या गाठी-भेटींचा आलेख
12 डिसेंबर 2024
वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट
23 जानेवारी 2025
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा
27 जानेवारी 2025
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन
22 मार्च 2025
अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र
10 एप्रिल 2025
जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र
12 एप्रिल 2025
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र
21 एप्रिल 2025
परिवार म्हणून एकत्र येणे ही आपली संस्कृती : अजित पवार
दरम्यान, तुमची आणि शरद पवार यांची तीनदा भेट झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात की, काका आणि पुतणे हे एकत्रच आहेत. तुम्ही एकत्र येणार आहात काय? विचारलं असता त्यावर अजित पवार म्हणाले, परिवारातील साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने परिवार म्हणून एकत्र येणे ही आपली संस्कृती, परंपरा आहे. वर्षानुवर्षे ते चालत आले आहे. परिवार म्हणून सर्वजण एकत्र येतो. बाकीच्यांनी त्यावर काहीही चर्चा करण्याचा प्रश्न नाही. हा पवार परिवाराचा अंतर्गत विषय आहे, असं अजित पवार म्हणाले.
शरद पवार हे ज्या संस्थांवर अध्यक्ष आहेत, तेथे मी सदस्य, ट्रस्टी म्हणून काम करतो. मी तेथे उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेवर अन्य पक्षांचेही प्रतिनिधी असून, साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. संस्थेचे अध्यक्षपद यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यानंतर शरद पवार हे भूषवत आहेत. शिक्षण कशा पद्धतीने मुला मुलींना देता येईल, निधी कसा उभा करता येईल, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.





