सांगली : सांगली (Sangli Politics) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 559 पदांच्या नोकर भरतीला सहकार विभागाने स्थगिती दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील बँकेला मोठा धक्का बसला आहे. भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर (Sangli Politics) यांनी या भरती प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीला यश मिळाले असून, सहकार विभागाने नोकर भरतीला तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत दिली. नोकर भरतीवर आक्षेप आणि तक्रार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार विभागाने 559 पदांसाठी नोकर भरतीची परवानगी दिली होती. मात्र, या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार आणि अनियमिततेचा आरोप करत आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवले होते. त्यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सहकार विभागाने तातडीने कारवाई करत नोकर भरतीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील बँकेच्या योजनांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बँकेतील घोटाळ्यांवर चौकशीची मागणी नोकर भरतीच्या स्थगितीबरोबरच आमदार सदाभाऊ खोत यांनी बँकेतील कथित घोटाळ्यांबाबत गंभीर आरोप केले. बँकेत सुरू असलेल्या चौकशी प्रकरणी पारदर्शकता यावी यासाठी निवृत्त न्यायाधीश किंवा निवृत्त सहकार आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत बँकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. बँकेतील कथित अनियमिततांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे नोकर भरती प्रक्रिया तूर्तास थांबली असली तरी याप्रकरणी पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या मागण्यांनुसार बँकेतील चौकशीसाठी समिती स्थापन होणार का ? आणि प्रशासकाची नेमणूक होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भवितव्यावर या प्रकरणाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.