Jayant Patil : ‘जयंत पाटील तुमच्या पक्षात येणार का?’, अजित पवारांनी लगावला मिश्किल टोला

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कालपासून सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ही चर्चा खोडून काढली असली, तरी अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शशिकांत शिंदे यांचे नाव या पदासाठी निश्चित झाल्याचे सांगितले जात असून, शिंदे यांनी स्वत: या शर्यतीत असल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि जयंत पाटलांचे माजी सहकारी अजित पवार यांनीही यावर भाष्य केले आहे.
पुणे जिल्ह्यातील विकासकामे आणि समस्यांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबी त्यांनी ठरवाव्यात, हा त्यांचा प्रश्न आहे.” असे ते म्हणाले.
जयंत पाटलांशी संबंध, पण राजकीय भूमिका वेगळी
जयंत पाटील तुमच्याबरोबर येणार का, असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आर. आर. पाटील आणि मी, १९९० च्या बॅचचे आमदार आहोत. अनेक वर्षे एकत्र काम केल्याने आमचे चांगले संबंध आहेत. पण माझी आणि त्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे, हे सर्वांना माहीत आहे.” असे अजित पवार म्हणाले.
पुढच्या आठवड्यात अधिवेशनात विचारेन
अजित पवार पुढे म्हणाले, “जयंत पाटलांनी राजीनामा का दिला, हे मला माहीत नाही आणि विचारण्याचा अधिकारही नाही. पुढच्या आठवड्यात अधिवेशनात भेट झाल्यास त्यांच्याशी याबाबत बोलणार. ते गेली सहा-सात वर्षे प्रदेशाध्यक्ष आहेत. कदाचित ते इतरांना संधी देऊन राष्ट्रीय पातळीवर जाण्याचा विचार करत असावेत.” जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, याबाबत पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





