Smriti Mandhana: सांगलीच्या स्मृतीचा जगभरात दबदबा; ICC रँकिंगमध्ये पटकावले अव्वल स्थान

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर व उपकर्णधार स्मृती मानधना हिने आयसीसीच्या ताज्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. वन डे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर स्मृतीसाठी ही मोठी कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात तिने केलेल्या अर्धशतकी खेळीचा (58 धावा) तिला क्रमवारीत फायदा झाला. तिने इंग्लंडची कर्णधार नॅट शिव्हर-ब्रंट हिला मागे टाकत 735 रेटिंग गुणांसह पहिला क्रमांक मिळवला. अव्वल दहा फलंदाजांमध्ये स्मृती ही एकमेव भारतीय खेळाडू आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या चार, इंग्लंडच्या दोन आणि दक्षिण आफ्रिका तसेच वेस्ट इंडीजच्या प्रत्येकी एका खेळाडूंचा यात समावेश आहे.
भारतीय खेळाडूंची क्रमवारीत मिश्र कामगिरी
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला एका स्थानाची घसरण सहन करावी लागली असून ती आता 12व्या क्रमांकावर आहे. स्मृतीने यापूर्वी 2019 मध्ये वन डे क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते, आणि आता पुन्हा एकदा तिने ही कामगिरी केली आहे. भारताची दुसरी सलामीवीर प्रतिका रावल हिने चार स्थानांची प्रगती करत 42वा क्रमांक मिळवला आहे, तर हर्लीन देओल पाच स्थानांच्या सुधारणेसह 43व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
गोलंदाजी आणि अष्टपैलू क्रमवारी
गोलंदाजीच्या क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टन अव्वल स्थानी कायम आहे, तर अव्वल पाचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार गोलंदाजांचा समावेश आहे. भारताची दीप्ती शर्मा तीन स्थानांनी घसरली असून ती आता सातव्या क्रमांकावर आहे. स्नेह राणा हिने पाच स्थानांची प्रगती करत 16वा क्रमांक मिळवला आहे, तर रेणुका सिंग ठाकूर एका स्थानाच्या घसरणीसह 26व्या क्रमांकावर आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची ॲश गार्डनर अव्वल स्थानी आहे. भारताची दीप्ती शर्मा चौथ्या स्थानावर कायम आहे, तर वेस्ट इंडीजची हेली मॅथ्यूज आणि दक्षिण आफ्रिकेची मॅरीझाने कॅप अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
ऑस्ट्रेलियाचा पहिल्या वन डेत दमदार विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना प्रतिका रावल (64), स्मृती मानधना (58) आणि हर्लीन देओल (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 7 बाद 281 धावा केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने फोएबे लिचफिल्ड (88), बेथ मूनी (77) आणि ॲनाबेल सदरलँड (54) यांच्या शानदार खेळीच्या बळावर 44.1 षटकांत 2 बाद 282 धावा करत 8 गडी आणि 35 चेंडू राखून दमदार विजय मिळवला.





