Pune District : अशियाई कुराश स्पर्धेत समृद्धी पाटीलचे कांस्यपदक
Pune District : ताजिकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या सीनियर एशियन कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकावत भारतासह महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या समृद्धी पाटील हिचा इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनात सत्कार करण्यात आला.

इंदापूर : ताजिकिस्तानमध्ये आशियाई कुराश स्पर्धेत कांस्यपदक जिंकून समृद्धी पाटीलने भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकावला आहे. हे यश केवळ तिचे किंवा तिच्या कुटुंबाचे नसून संपूर्ण इंदापूर, पुणे, महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे.
ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंमध्ये जागतिक स्तरावर यश मिळविण्याची अपार क्षमता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि समाजाचे भक्कम पाठबळ मिळाल्यास ते देशासाठी अधिकाधिक पदके जिंकू शकतात. अशा प्रतिभावान खेळाडूंचा सन्मान करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
समृद्धीने भविष्यात सुवर्णपदक जिंकून भारताचा तिरंगा आणखी उंचावावा, हीच शुभेच्छा, असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त भरत शहा यांनी केले.
ताजिकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या सीनियर एशियन कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकावत भारतासह महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या समृद्धी पाटील हिचा इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनात सत्कार करण्यात आला. श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा कुराश असोसिएशन, कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि इंदापूर तालुका ज्युदो-कराटे स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, खेळाडू आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते समृद्धी पाटील हिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तिचा ५ हजारांचे रोख पारितोषिक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हा कुराश असोसिएशनच्या सचिव तेजश्री व्यवहारे, कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सहसचिव दत्तात्रय व्यवहारे, इंदापूर तालुका ज्युदो-कराटे स्पोर्ट अकॅडमीच्या मार्गदर्शिका जयश्री व्यवहारे, आंतरराष्ट्रीय कुराश रेफ्री अनिकेत व्यवहारे, प्रशिक्षक सुनील जाधव तसेच आरशाद सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.





