मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात संभाजीराजे यांचा मूक एल्गार

खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला. 

पावसाची तमा न करता हजारो कार्यकर्ते आंदोलनस्थळी हजेरी लावली आहे. पक्ष आणि संघटना विरहित या आंदोलनातून मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाची संघटित शक्ती एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सुरू झालेल्या या आंदोलनातून मराठा आरक्षणासंबंधी नवी दिशा मिळेल असा विश्वास सारेच बाळगून आहेत

‘आता समाज नाही, लोकप्रतिनिधी बोलणार’ या सुत्रानुसार मंत्री, खासदार आणि आमदार मंडळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय भूमिका निभावणार हे स्पष्ट होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील आमदार सहभागी झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाधीस्थळी देऊन आंदोलनाला पाठिंबा घोषित केला.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक होत आहे. खासदार संभाजीराजे यांनी राज्यभर दौरे, सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी धडपडत आहेत. मराठा आरक्षणचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला सवलती द्याव्यात अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

त्यामध्ये पाच प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींची भूमिका स्पष्ट व्हावी या उद्देशाने बुधवारी, ता. सोळा जून रोजी नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन पुकारले आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत हे आंदोलन होत असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

सकाळपासूनच आंदोनलस्थळी मराठा समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी गर्दी करायला सुरुवात केली. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती यांची आंदोलनस्थळी आगमन झाले.

संबंधित बातम्या  –
मराठा आरक्षण: कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात; चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग
हाताला सलाईन, अंगात अशक्तपणा, तरीही धैर्यशील माने भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!
मराठा आरक्षण: मान-सन्मान राखून, करोनाचे नियम पाळून आंदोलन करू – संभाजीराजे
उपमुख्यमंत्री अजित पवार शाहू महाराजांच्या भेटीला; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केले ‘हे’ विधान

छत्रपती शिवाजी महाराज, करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. आंदोलनाला जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर यांनीही पाठिंबा दिला. जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधीही आंदोलनस्थळी सहभागी होत आहेत. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती मार्गदर्शन करणार आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी कोल्हापुरातील मूक आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी आंदोलन होत आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनातून निश्चितच वेगळा संदेश मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राला दिशा मिळेल.
–  मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना आमचा पाठिंबा राहील. मी एक नागरिक म्हणून या आंदोलनात सहभागी होत आहे. माझ्यासह भाजपचे सगळे पदाधिकारी आंदोलनात सहभागी आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आंदोलनात सहभाग आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा राहील.
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.