सलील कुलकर्णींचे हॉटेल व्यवसायात पदार्पण; खास व्यक्तीच्या हस्ते केले उद्घाटन

Saleel Kulkarni| गायक, संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून सलील कुलकर्णी यांची देशभरात ओळख आहे. मात्र आता त्यांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आहे. सलील यांनी पुण्यात एक नवे हॉटेल सुरू केले आहे. या हॉटेलच्या उद्घाटन दरम्यानचा कुटुंबीयांसोबतचा फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
भारतीय संघाने 29 जून रोजी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सलील यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. “गाण्यांबरोबर अजून एक वेड म्हणजे खाणं आहे. कुठेतरी असं वाटतं होतं की, खाण्यासंबंधित काहीतरी करायला हवं आणि असा विचार करत बँगलोर कँटीन येथे एक दिवस आलो. इथला डोसा खाल्ला आणि कॉफी प्यायलो आणि असं वाटलं की, यात आपला काहीतरी सहभाग हवा. त्यामुळे आता माझा बँगलोर कँटीनमध्ये सहभाग असणार आहे. लवकरच नवीन ब्रँच सिंहगडच्या खाऊगल्लीमध्ये येत आहे,” असे सलील कुलकर्णी यांनी व्हिडिओ शेअर करत सांगितले होते.
दरम्यान, ३० जून रोजी त्यांनी हे जाहीर केल्यानंतर काहीच दिवसांनी त्यांनी ‘बँगलोर कँटीन’च्या या नव्या ब्रँचचे त्यांच्या आईच्या हस्ते उद्घाटन केले. या उद्घाटनावेळचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची. काल आम्ही तिच्या हस्ते बँगलोर कँटीनचं उद्घाटन केलं. नक्की भेट द्या सिंहगड रोड खाऊगल्ली येथील बँगलोर कँटीनला.” सध्या सलील कुलकर्णी यांनी नवीन सुरुवात केल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सलील कुलकर्णींच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाला ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळाला.
हेही वाचा:
मुंबईत मुसळधार पाऊस; सकाळच्या सत्रातील सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर





