Pune District : संत सोपानकाका पालखीचे बारामती तालुक्यात स्वागत
Pune District : संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने मांडकी (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटोपून निरा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दुपारचा विसावा घेतला.

सोमश्वरनगर : संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवार, दि. सायंकाळी निंबूत नगरीत भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. “ज्ञानोबा-तुकाराम”, “सोपानकाका महाराज की जय”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यंदा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढल्याने निंबूतकरांनी सेवाभावाची परंपरा जपत त्यांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छता व इतर सर्व सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था केली.
संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने मांडकी (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटोपून निरा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दुपारचा विसावा घेतला. त्यानंतर सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता पालखीचे निंबूतमध्ये आगमन होताच भाविकांनी फुलांची उधळण करत व टाळ-मृदुंगाच्या गजरात स्वागत केले.
यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजीराव काकडे, शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती प्रमोद काकडे, निंबूतचे सरपंच काळे, उपसरपंच अमर काकडे, कृषी जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष गौतम काकडे, पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, माजी उपसरपंच उदय काकडे, मदन काकडे,दिग्विजय काकडे, विजयराव काकडे, राजकुमार बनसोडे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे भावपूर्ण स्वागत केले.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, राहुल साबळे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. नायब तहसीलदार प्रमिला लोखंडे, मंडळ अधिकारी रोहित वाघचौरे, पंचायत समितीचे प्रशांत इंगोले, नामदेव काळे तसेच महसूल, आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या पालखी सोहळ्यात रथासमोर २७ तर रथामागे तब्बल ९३ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, निंबूतकरांनी सेवेलाच देव मानत प्रत्येक वारकऱ्याच्या राहण्याची, भोजनाची आणि इतर सर्व सोयींची अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे. गावातील प्रत्येक घरातून सेवाभाव आणि भक्तीचे दर्शन घडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, बुधवार (दि. १५) रोजी पालखी निंबूत येथील मुक्काम आटोपून यशवंतनगर व वाघळवाडी येथे विसावा घेणार आहे. दुपारी सुमारे ३ वाजता मुसा काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पारंपरिक घोड्याचे रिंगण रंगणार असून, सायंकाळी सुमारे ५ वाजता पालखी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पालखीस्थळी मुक्कामी पोहोचणार आहे. या सोहळ्याबाबत पंचक्रोशीतील भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असून भक्ती, सेवा आणि समर्पणाचा संगम अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.





