Sai Sudharsan Record : साई सुदर्शनने शतक ठोकत रचला नवा इतिहास! ख्रिस गेलला मागे टाकत आयपीएलमध्ये केला मोठा पराक्रम
Sai Sudharsan Record : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने साई सुदर्शनच्या शतकी खेळीच्या जोरावर २०५ धावांचा डोंगर उभारला.

Sai Sudharsan fastest 2000 IPL runs record : आयपीएल २०२६ मधील ३४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील लढत एका ऐतिहासिक विक्रमाची साक्ष देणारी ठरली. गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन याने बंगळुरूच्या गोलंदाजांचा समाचार घेत केवळ शतकच झळकावले नाही, तर ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा वर्षांनुवर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.
साई सुदर्शनने रचला इतिहास –
चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा आरसीबीचा निर्णय गुजरातच्या साई सुदर्शनने पूर्णपणे चुकीचा ठरवला. सुदर्शनने अवघ्या ५७ चेंडूंमध्ये आपले झंझावाती शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने आयपीएल कारकिर्दीतील २००० धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, अवघ्या ४७ डावांमध्ये हा पल्ला गाठून त्याने ख्रिस गेलचा (४८ डाव) विक्रम मोडला आणि आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २००० धावा करणारा फलंदाज बनला.
चेंडूंच्या हिशोबातही सुदर्शनची भरारी –
Sai Sudharsan becomes the first Indian to score an IPL 100 in 3 consecutive seasons
Chris Gayle did so in 2011-13 🙌 pic.twitter.com/thJTAu6iy8
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 24, 2026
साई सुदर्शनने २००० धावांचा टप्पा १३६१ चेंडूंमध्ये गाठला. चेंडूंच्या संख्येनुसार वेगवान २००० धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत अभिषेक शर्मा (११९३ चेंडू) अव्वल स्थानी आहे, तर वीरेंद्र सेहवाग आणि ऋषभ पंत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सुदर्शनने आपल्या १०० धावांच्या खेळीत ११ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचले.
भारतीय क्रिकेटमधील अनन्यसाधारण विक्रम –
साई सुदर्शन आता असा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे, ज्याने आयपीएलच्या सलग तीन हंगामात (२०२४, २०२५ आणि २०२६) शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. जोश हेझलवूडने त्याला बाद केले, मात्र तोपर्यंत त्याने गुजरातला मजबूत स्थितीत पोहोचवले होते. सुदर्शनच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघनिवडीसाठी त्याने प्रबळ दावा ठोकला आहे. गेल, मार्श आणि गायकवाड यांसारख्या दिग्गजांना मागे टाकणाऱ्या सुदर्शनच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





