Rinku Singh : दुःखद बातमी! क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन
Rinku Singh : क्रिकेटपटू रिंकू सिंह याच्या वडिलांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे.

Rinku Singh : टी-२० विश्वचषकातील टीम इंडियाच्या महत्वाच्या खेळांडूपैकी एक असलेल्या रिंकू सिंह (Rinku Singh) याच्या वडिलांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून खाचंद्र सिंह यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली आहे.
रिंकू सिंहचे वडील खाचंद्र सिंह हे स्टेज ४ यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आहे. खाचंद्र सिंह यांच्या निधनामुळे सिंह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या बातमीमुळे रिंकू सिंह याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. आता वडिलांच्या निधनानंतर रिंकू सिंग टी 20 स्पर्धेत खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वडिलांच्या बिघडत्या प्रकृतीची माहिती मिळताच रिंकू सिंह याला अचानक टीम इंडिया ,(Teamindia) सोडून घरी परतावे लागले. खाचंद्र सिंह अनेक दिवसांपासून मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर होते आणि त्यांना सतत रेनल रिप्लेसमेंट थेरपी दिली जात होती. मंगळवारी टीम इंडियाने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सराव सत्र आयोजित केले होते, पण रिंकू सिंह सहभागी झाला नाही. त्यानंतर काही वेळातच त्याला वडील आजारी असल्याची बातमी समजली आणि तो त्याच्या घरी परतला.
ती भेट ठरली शेवटची
रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा आहे. रिंकूने वडिलांना काही दिवसांपूर्वीच महागडी एक गाडी गिफ्ट दिली होती. 24 फेब्रुवारी रोजी रिंकूने वडिलांची भेट घेतली आणि त्याची ही भेट शेवटची ठरली. रिंकू अनेकदा त्याच्या मुलाखतीमध्ये वडिलांबद्दल बोलताना दिसला. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरोघरी सिलेंडर पोहोचवण्याचे काम रिंकू सिंहच्या वडिलांनी केले. अत्यंत कष्ट करून तो भारती क्रिकेट संघात दाखल झाला.






