रिंकूची वाटचाल प्रेरणादायी

आयपीएल स्पर्धा देशातील खेळाडूंसाठी खरोखरच दर्जा सिद्ध करण्याचे मोठे व्यासपीठ ठरत आहे. मात्र, दर्जेदार खेळाडूंना संधी मिळत आहे हेच त्यातील सर्वात महत्त्वाचे. उदाहरणच द्यायचे झाल्यास उत्तर प्रदेशमधून पुढे आलेल्या रिंकू सिंहचे देता येईल. परिस्थिती अशी की, त्याला घर चालवण्यासाठी चक्क सफाई कामगार म्हणून काम करावे लागले. तो आज आयपीएल स्टार बनून आपल्या कुटुंबीयांना हालाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात यशस्वी ठरला आहे. त्याच्याकडून आता देशातील नवोदितांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये जन्मलेला रिंकू आपल्या परीने वडिलांना घर चालवण्यासाठी मदत करत होता. एकीकडे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते, पण घरची परिस्थिती त्याच्यासाठी अडथळाही ठरत होती. त्याचे वडील घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवण्याचे काम करायचे. यशाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने त्याने वडिलांना मदत व्हावी, यासाठी चक्क सफाई कर्मचारी बनून झाडू मारण्याचे काम पत्करले, पण म्हणतात ना एक ना एक दिवस तुमचे यश तुम्हाला शोधत येते. तेच रिंकूबाबत घडले. तो राजधानीतील एका स्पर्धेत चमकदार कामगिरीच्या जोरावर यशस्वी ठरला व तेथून त्याचा आयपीएल स्टार बनण्याचा प्रवास सुरू झाला.
2014 साली त्याला उत्तर प्रदेशकडून टी-20 दर्जाच्या तसेच लिस्ट अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले. त्यानंतर 2016 साली त्याने प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत 30 प्रथम दर्जाचे सामने खेळताना आपली गुणवत्ता सिद्ध करत 5 शतके व 16 अर्धशतके फटकावली आहेत. त्याचे नाव वर्तमानपत्रांत झळकायला लागले.
2017 साली त्याला त्याच्या 10 लाख या बेसप्राइजवर पंजाब किंग्जने खरेदी केले. मात्र, त्या मोसमात त्याला केवळ एकच सामना खेळायला मिळाला. त्यानंतर 2018 साली झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने आपल्याकडे घेतले. मात्र, लगेचच त्याला रिलीजही केले. मात्र, याच कोलकाता संघाने देशांतर्गत स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहून यंदाच्या मोसमात त्याला तब्बल 55 लाख रुपयांना खरेदी केले. त्याने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात आपला दर्जा सिद्ध करणारी 35 धावांची छोटी खेळी केली. त्याच्या संघाचा पराभव झाला असला तरीही त्याच्या खेळाचे कौतुक खुद्द विक्रमादित्य सुनील गावसकरांनी केले.
यातच त्याच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र दिसून येते. आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केल्यास त्याला निश्चितच आणखी मोठ्या स्तरावरचे क्रिकेट खेळायला मिळेल. कदाचित देशाकडून खेळण्याचे त्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकेल. परिस्थिती कोणतीही असो किंवा तुम्ही कोणत्याही वातावरणात वाढलेले असो; परंतु जिद्द असेल तर आकाशालाही गवसणी घालता येते, हेच रिंकूने दाखवून दिले आहे.





