Ruturaj Gaikwad : कॅप्टन्सी इनिंग! ऋतुराजच्या शतकाने उत्तराखंडला नमवलं; महाराष्ट्राचा दिमाखदार विजय

Ruturaj Gaikwad Century in Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या रोमांचक सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने झंझावाती शतक झळकावत संघाला शानदार विजय मिळवून दिला. जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात उत्तराखंडविरुद्ध फलंदाजी करताना महाराष्ट्राची अवस्था एकवेळ ३ बाद ५० अशी बिकट झाली होती. मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋतुराजने खिंड लढवत संघाचा डाव सावरला.
गायकवाडचे शानदार शतक; महाराष्ट्राचा मोठा विजय –
ऋतुराज गायकवाडने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत ११३ चेंडूंत १२४ धावा कुटल्या. या खेळीत त्याने १२ चौके आणि ३ षटकार ठोकले. त्याच्या या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद ३३१ धावांचा डोंगर उभा केला. ऋतुराजव्यतिरिक्त सत्यजित बच्छावने ५६ धावांची, तर रामकृष्ण घोषने ४७ धावांची महत्त्वाची भर घातली.
३३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संघ ४३.४ षटकांत केवळ २०२ धावांत गारद झाला. महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगरगेकर आणि सत्यजित बच्छाव यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतले, तर रामकृष्ण घोष आणि सिद्धेश वीर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. महाराष्ट्राने हा सामना १२९ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
हेही वाचा – Sarfaraz Khan : सर्फराझ खानचा विजय हजारे ट्रॉफीत शतकी धमाका! रोहित शर्माचा मोडला खास विक्रम
श्रेयस अय्यरच्या अडचणीत वाढ?
ऋतुराज गायकवाडचे हे शतक भारतीय संघाच्या निवडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडे शतक झळकावल्यानंतर, ऋतुराजने आता न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेपूर्वी आपली दावेदारी प्रबळ केली आहे. विशेष म्हणजे त्याने ही खेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना केली आहे.
सध्या भारतीय वनडे संघात चौथ्या क्रमांकावर खेळणारा श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर आहे. अशा परिस्थितीत ऋतुराजचा हा फॉर्म श्रेयस अय्यरच्या पुनरागमनासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.





