इस्तंबुल, (तुर्की) – रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे काळ्या समुद्रातून केल्या जाणाऱ्या धान्य वितरणासंदर्भात निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये इस्तंबुलमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. रशिया आणि युक्रेनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या आणि तुर्कीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
धान्य वितरणाबाबतची चर्चा प्रगतीपथावर आहे आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही चर्चा केली जात आहे, असे रशियाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ही चर्चा संयुक्त राष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीतून तुर्कीची राजधानी इस्तंबुलमध्ये होत आहे, असेही रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ओप्पो इंडिया कंपनीची 4,389 कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी उघड
रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये मार्च महिन्याच्या प्रारंभी युद्धसमाप्तीबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांचे अधिकारी चर्चेसाठी एकमेकांसमोर आले आहेत. युक्रेनचे धान्य काळ्या समुद्रातून वितरीत करण्यासंदर्भात निर्माण झालेल्या कोंडीसह अन्य विषयांवर चर्चेला आपली सहमती असल्याचे रशियाने अलिकडेच म्हटले होते.
रशिया-युक्रेनदरम्यानच्या युद्धामुळे अन्नधान्य आणि इंधनाच्या पुरवठ्यावर झालेल्या परिणामासंदर्भात अलिकडेच बालीमध्ये झालेल्या जी-20 गटाच्या बैठकीतही चर्चा झाली होती.
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्यावर अंत्यसंस्कार